मुंबई - Mothers Day 2024 :भारतासह अनेक देशांमध्ये दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी म्हणजेच 12 तारखेला 'मदर्स डे' साजरा केला जातो. आईबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जगभरात हा दिवस साजरा केला जातो. आई फक्त मुलाला जन्म देत नाही तर त्याचे पालनपोषणही करते आणि आयुष्यातील प्रत्येक सुख-दु:खात आपल्या मुलाच्या पाठीशी उभी राहते. आईशी नातं जन्मापूर्वीच तयार होत असतं. आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही. दरम्यान 'मदर्स डे' साजरा करण्याची सुरुवात अमेरिकन महिला ॲना जार्विस यांनी केली होती. यानंतर 'मदर्स डे' साजरा करण्याची औपचारिक सुरुवात 9 मे 1914 रोजी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी केली.
'मदर्स डे'चा इतिहास : अमेरिकन संसदेत कायदा करून दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी 'मदर्स डे' साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर अमेरिका, युरोप आणि भारतासह अनेक देशांमध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी 'मदर्स डे' साजरा केला जाऊ लागला. 'मदर्स डे'ची सुरुवात ॲना जार्विस यांनी केली असून तिला तिची आई खूप आवडत होती. ॲना आईबरोबर राहत असल्यानं तिनं कधीही लग्न केलं नाही. आईच्या निधनानंतर ॲनानं आपल्या आईवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी 'मदर्स डे' साजरा करण्यास सुरुवात केली. युरोपमध्ये या दिवसाला 'मदरिंग संडे' म्हणतात, तर ख्रिश्चन समुदायातील अनेक लोक या दिवसाला व्हर्जिन मेरीच्या नावानं संबोधतात. तर अमेरिका, भारत आणि कॅनडामध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी 'मदर्स डे' म्हणून हा दिवस साजरा केला जातो.