इंफाळ Manipur Violence : मणिपूरमध्ये जारी असलेला हिंसाचार थांबण्याचं नाव नाही. गुरुवारी (15 फेब्रुवारी) रात्री जमावानं एसपी कार्यालयावर हल्ला केल्याचं वृत्त आहे. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला, ज्यामध्ये हेड कॉन्स्टेबल एका सशस्त्र व्यक्तीसोबत दिसत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर हेड कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आलं.
300-400 लोकांच्या जमावानं हल्ला केला : मिळालेल्या माहितीनुसार, चुरचंदपूरच्या एसपी कार्यालयात ही घटना घडली. चुरचंदपूर हे तेच क्षेत्र आहे जिथे गेल्या वर्षी 3 मे रोजी कुकी आणि मैतेई समुदायांमध्ये हिंसाचार झाला होता. तेव्हापासून मणिपूरमधील परिस्थिती तणावपूर्ण आहे. एसपी कार्यालयात झालेल्या हल्ल्याच्या घटनेची माहिती देताना मणिपूर पोलिसांनी 'X' वर सांगितलं की, 300-400 लोकांच्या जमावानं एसपी सीसीपीच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. जमावानं दगडफेकही केली. रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) तसेच सुरक्षा दलाच्या जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.