नवी दिल्ली-लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान पंतप्रधान मोदींच्या मेक इन इंडिया कार्यक्रमाचे कौतुक केले असले तरीराष्ट्रपतींच्या अभिभाषणावर संसदेत झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी भाजपा सरकारवर टीकास्त्र डागलंय. राहुल गांधी लोकसभेत म्हणाले की, राष्ट्रपतींच्या भाषणात काहीही नवीन नव्हते. मी खरगेंशी भाषणासंदर्भात चर्चा केली, पण त्यात काही खास नव्हते. या देशाचे भविष्य तरुण ठरवणार असले तरी बेरोजगारीवर अद्याप उपाय सापडलेला नाही. यूपीए सरकार किंवा एनडीए सरकार असो त्यावर कोणालाही तोडगा काढता आलेला नाही.
शिर्डीतील एकाच इमारतीत 7 हजारांहून अधिक मतदार :विशेष म्हणजे लोकसभेतील भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील निवडणुकींवरही बोट ठेवलंय. "लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्राच्या मतदार यादीत जवळपास 70 लाख नवीन मतदारांची भर पडलीय. खरं तर ते हिमाचल प्रदेश राज्याच्या लोकसंख्येइतके आहे. शिर्डीतील एकाच इमारतीत 7 हजारांहून अधिक मतदारांची नोंदणी झालीय. या सगळ्यात काही तरी गोंधळ आहे," असंही राहुल गांधी म्हणालेत.
'मेक इन इंडिया'चा विचार चांगला :राहुल गांधी पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदींचा 'मेक इन इंडिया'चा विचार चांगला होता, पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. मी असे म्हणत नाही की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रयत्न केले नाहीत. पण पंतप्रधानांच्या प्रयत्नांना कोणतेही यश मिळाले नाही. आम्ही उत्पादन चीनच्या हाती सोपवलेले आहे. मोबाईल उत्पादन चीनला देण्यात आलंय. भारताला उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. मोबाईल फोन दाखवत राहुल गांधी म्हणाले की, हा फोन फक्त भारतातच असेम्बल केला जातोय. त्याचे सर्व पार्ट चीनमधून येथे आणले जाताहेत, त्यानंतर ते फोन बनवण्यासाठी येथे सगळं एकत्र केले जाते.