लखनऊ : कनौज रेल्वे स्थानकाजवळ अमृत भारत योजनेअंतर्गत बांधण्यात येत असलेल्या इमारतीचं छत कोसळून अपघात झाला. या अपघातात तब्बल 25 कामगार ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना शनिवारी दुपारी 2.20 च्या दरम्यान घडली. या अपघातात इमारतीचं छत कोसळल्यानं हे 25 जण दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या 6 कामगार बाहेर काढण्यात आलं. इतर कामगार अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असून जेसीबीच्या मदतीनं बचाव कार्य सुरू आहे. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. जखमींना रुग्णालयात पाठवलं आहे. या घटनेची माहिती मिळताच समाजकल्याण राज्यमंत्री असीम अरुण यांनी देखील घटनास्थळावर धाव घेतली.
कन्नौज रेल्वे स्टेशनचं सुशोभीकरण :अमृत भारत योजनेअंतर्गत कन्नौज रेल्वे स्टेशनचं सुशोभीकरण केलं जात आहे. शनिवारी दुपारी कामगार इमारतीचं बांधकाम करत होते. यावेळी इमारतीचं छत कोसळलं. मात्र मानकांनुसार साहित्य न वापरल्यामुळे छत कोसळल्याचा आरोप करण्यात येत आहे. अपघातातून वाचलेल्या कामगारांच्या मते छत टाकणारे 20 कामगार दोरीवर उभे होते, तर खाली तब्बल 10 कामगार काम करत होते. हे कामगार पडणाऱ्या छताच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीनं 11 जणांना रुग्णवाहिकेनं जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. जखमी 18 कामगारांपैकी 2 कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.