नवी दिल्ली- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट आहे. भारतीय निवडणूक आयोग दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करणार आहे.
भारतीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रासह झारखंडमधील विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक आज जाहीर होणार आहे. यापूर्वी निवडणूक आयोगानं सुरक्षा व्यवस्था आणि सणांमुळे महाराष्ट्रातील निवडणूक ही जम्मू काश्मीरच्या निवडणुकांबरोबर घेणं शक्य नसल्याचं म्हटलं होतं. निवडणुकीचे आज वेळापत्रक जाहीर होताच आचारसंहिताही लागू होणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारला महत्त्वाच्या विकास कामांची आणि निर्णयांची घोषणा करता येणार नाही.
शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिलीच विधानसभा-राज्यातील 288 मतदासंघातील निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती विरोधात लढा असणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्ष, भाजपा, शिवसेना शिंदे पक्ष हे महायुतीत आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेना ठाकरे हे महाविकास आघाडीत आहेत. मनसे स्वतंत्र निवडणूक लढविणार आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील फुटीनंतर ही पहिलीच विधानसभा निवडणुका असणार आहे. या निवडणुकीच्या निकालावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे राजकीय भवितव्य पणाला लागणार आहे.
निवडणूक आयोगानं पारदार्शकपणं आणि निष्पक्षपणं निवडणुका घ्याव्यात. पोस्ट मतांमध्ये घोळ होतात. प्रत्येक मतदारसंघात 15 ते 20 कोटींचे वाटप करण्यात आले आहे. राज्यपाल घटनाबाह्य काम करतात. राज्यपाल नियुक्त ७ आमदारांची नावे घटनाबाह्य आहेत. निवडणुकीपूर्वी घाईघाईत शपथ घेतली जात आहे- शिवसेना खासदार संजय राऊत
- राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून विरोधकांनी राज्य सरकारला अनेकदा घेरलं आहे. दुसरीकडं महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुंबईत प्रवेश करणाऱ्या वाहनांकरिता टोलमाफी अशा विविध योजना जाहीर करून महायुती सरकारनं जनतेला खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसभा निवडणुकीत महायुती सरकारला मोठा फटका बसला होता. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा विधानसभा निवडणुकीत महायुतीला अपयश येऊ नये, यासाठी महायुतीच्या नेत्यांनी राजकीय वर्चस्व पणाला लावलं आहे.