नवी दिल्ली : लोकसभेच्या सभापती पदासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात एकमत होण्याचे प्रयत्न फोल ठरले आहेत. एनडीएनं लोकसभा सभापती पदासाठी ओम बिर्ला यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यावर विरोधकांनी लोकसभा उपसभापती पदाची मागणी केली. मात्र, त्यावर एनडीएकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यानं इंडिया आघाडीनंही के. सुरेश यांना लोकसभा सभापती पदासाठी उमेदवारी दिली.
काँग्रेसनं के. सुरेश यांना लोकसभा सभापती पदासाठी उमेदवारी दिल्यानं एनडीए सरकारच्या नेत्यांनी टीका केली. केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार पीयूष गोयल यांनी म्हटले, "त्यांनी ( इंडिया आघाडी) आधी उपसभापती पदासाठी नाव निश्चित करावं मग आम्ही उपसभापती उमेदवाराला पाठिंबा देऊ. आम्ही त्यांच्या राजकारणाचा निषेध करतो. लोकसभेचा सभापती कोणत्याही पक्षाचा किंवा विरोधी पक्षाचा नसतो. केंद्रीय मंत्री चिराग पासवान म्हणाले "ही कोणत्याही पक्षाची निवडणूक नाही. सभापतीची निवडणूक ही लोकसभेच्या सभागृहासाठी असते. स्वातंत्र्यानंतर लोकसभेच्या सभापती पदासाठी निवडणूक झाल्याचं आठवत नाही."
लोकसभेचे उपसभापतीपद विरोधकांकडे हवे-काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी संसद बाहेर माध्यमांशी बोलताना सांगितले की, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभा सभापती पदाबद्दल बोलण्यासाठी काँग्रेस अध्यक्षांना कॉल करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यांनी तसा संपर्क साधला नाही. विरोधक हे लोकसभा सभापती पदासाठी सत्ताधारी पक्षाला समर्थन देण्यास तयार होते. मात्र, लोकसभेचे उपसभापतीपद विरोधकांकडे गेले पाहिजे, अशी आमची अट आहे. यापूर्वीच्या सरकारांमध्येही असे घडले असून ही परंपरा आहे."
राहुल गांधींची नरेंद्र मोदींवर टीका-पुढे काँग्रेसचे माजी अध्यक्ष गांधी म्हणाले, "विरोधकांनी सरकारला सकारात्मक पाठिंबा द्यावा, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. पण, राजनाथ सिंह यांनी काँग्रेस अध्यक्षांना पुन्हा फोन करणार असल्याचे सांगितल्यानंतर त्यांचा फोन आलेला नाही. हा आमच्या नेत्याचा अपमान आहे. त्यांचा हेतू स्पष्ट दिसत नाही. यूपीएच्या काळात विरोधकांना लोकसभेचं उपाध्यक्ष पद दिलं होतं," अशी आठवणही राहुल गांधी यांनी सांगितली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणतेही सकारात्मक सहकार्य आवश्यक वाटत नाही. पंतप्रधानांचं बोलणं आणि कृती वेगळी असते. हीच त्यांची रणनीती आहे. पंतप्रधानांच्या बोलण्यात काही अर्थ नाही. परस्पर सहकार्य हवं असं म्हणतात, पण ते वेगळेच करतात."
- काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. यावेळी ते म्हणाले, " सरकारकडून उपसभापती पदाचा नंतर विचार करण्याबाबत सांगण्यात येत आहे. आताच लोकसभा सभापतीपदासाठीच्या नामनिर्देशन पत्रावर स्वाक्षरी करणं विरोधकांना मान्य नाही. त्यामुळे लोकसभा सभापती पदासाठी आम्ही आमचा उमेदवार उभा केला."
हेही वाचा-
- लोकसभा अधिवेशन 2024; लोकसभेचं उपसभापती पद द्या, राहुल गांधींची मागणी, ओम बिर्लांनी भरला सभापती पदासाठी अर्ज - Lok Sabha Session 2024
- लोकसभा अधिवेशन 2024; लोकसभेचं उपसभापती पद द्या, राहुल गांधींची मागणी, ओम बिर्लांनी भरला सभापती पदासाठी अर्ज - Lok Sabha Session 2024