लखनौ- महायुतीत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीबरोबर ( अजित पवार गट) युती केल्यानं राजकीय डावपेच आखण्यात आणि विरोधकांना नामोहरम करण्याकरिता भाजपाकडून रणनीती आखण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपानं राजकीय रणनीतीप्रमाणं काम करण्याकरिता राज्यसभेचे खासदार दिनेश शर्मा यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी सोपविली आहे. ते राज्याचे प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत.
उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार दिनेश शर्मा यांचं भाजपामधील महत्त्व अधिक वाढलं आहे. त्यांच्यावर लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि गुजरातचे प्रभारी म्हणून काम पाहिले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळचे संबंध-दिनेश शर्मा यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून झाली. त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांनी लखनौचे महापौर, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री म्हणूनदेखील जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. २०२३ मध्ये त्यांची उत्तर प्रदेशच्या राज्यसभा पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झाली. शर्मा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अत्यंत जवळचे मानले जातात.
गुजरातमधील निवडणुकीतून शाह-मोदींचा जिंकण्याचा विश्वास-लखनौ विद्यापीठाच्या वाणिज्य विभागातील प्राध्यापक म्हणून शर्मा कार्यरत होते. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांचा पक्षामधील प्रगतीचा लेख उंचावत गेला आहे. गुजरातमध्ये निवडणुकीचे प्रभारी म्हणून काम करताना शर्मा यांनी पक्षाचे चांगले काम करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन भाजपा अध्यक्ष अमित शाह यांचा विश्वास जिंकला.
भाजपानं उत्तर प्रदेशमध्ये तीन सह-प्रभारींच्या केल्या नियुक्त्या-भाजपानं रमेश बिधूडी, संजय भाटिया आणि संजीव चौरसिया यांची उत्तर प्रदेशच्या सह-प्रभारी पदी नियुक्ती केली आहे. खासदार रमेश बिधूडी हे दिल्लीमधील भाजपाचे वरिष्ठ नेते आहेत. ते पक्षामधील संघटन कौशल्यामुळे ओळखले जातात. बिहारचे संजीव चौरसिया हे दीघा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये सह प्रभारी म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली होती. विशेषत: पूर्वांचलमध्ये रणनीती तयार करण्यात चौरसिया यांनी विशेष कार्य केलं आहे. हरियाणाचे संजय भाटिया कर्नाल लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. यावेळी कर्नाल लोकसभा मतदारसंघातून मनोहर खट्टर यांना लोकसभेचे तिकीट देण्यात आलं आहे. तर संजय भाटिया यांच्यावर उत्तर प्रदेशमधील संघटन अधिक बळकट करण्याकरिता सह प्रभारी पदाची जबाबदारी दिली आहे.
हेही वाचा-
- पाच वर्षात गडकरींच्या संपत्तीत 116 टक्क्यांनी वाढ; महाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरेंची किती आहे संपत्ती? - Nagpur Lok Sabha Constituency
- लोकसभेची उमेदवारी मिळताच नवनीत राणांनी पतीच्या पक्षाचा दिला राजीनामा, शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये केला पक्षप्रवेश - NAVNEET RANA Joins BJP