नवी दिल्ली - भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची सूत्रांनी माहिती दिली.
अपोलो रुग्णालयानं वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार 96 वर्षीय अडवाणी यांना मंगळवारी सकाळी इंद्रप्रस्थ येथील अपोलो हॉस्पिटलच्या न्यूरोलॉजी विभागात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, माजी गृहमंत्र्यांना डॉक्टरांच्या देखरेखखाली ठेवण्यात आलं आहे. यापूर्वी जुलैच्या पहिल्या आठवड्यातही अडवाणी यांची प्रकृती खालावली होती. त्यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. काही दिवस देखरेखखाली ठेवल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. न्यूरोलॉजी विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. विनीत सुरी हे अडवाणी यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.
रुग्णालयातून सोडण्यात येणार-लालकृष्ण अडवाणी यांना 30 मार्च 2024 रोजी भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आलं. देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाल्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी म्हटलं, " हा केवळ त्यांच्यासाठीच नाही तर त्यांच्या आदर्श आणि तत्त्वांचाही सन्मान आहे." यापूर्वी 2015 मध्ये अडवाणी यांना देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या पद्मविभूषणनं सन्मानित करण्यात आलं. डॉ. विनित सुरी यांच्या माहितीनुसार लालकृष्ण अडवाणी यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये नियमित तपासणीसाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती ठीक असून लवकरच त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येणार आहे.
आधी गृहमंत्री, त्यानंतर उपपंतप्रधान पदाची जबाबदारी-लालकृष्ण अडवाणी यांनी 2002 ते 2004 पर्यंत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये उपपंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळली. अडवाणी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1927 रोजी कराची येथे झाला. अडवाणी हे 1942 मध्ये स्वयंसेवक म्हणून राष्ट्रीय स्वंयसेवकात सहभागी झाले. त्यांनी 1986 ते 1990, त्यानंतर 1993 ते 1998 आणि 2004 ते 2005 पर्यंत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पक्षाच्या संघटनाची महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. लालकृष्ण अडवाणी हे प्रथम गृहमंत्री होते. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (1999-2004) यांच्या मंत्रिमंडळात उपपंतप्रधान होते.
हेही वाचा-