नवी दिल्ली/कोलकाता Kolkata Doctor Rape Murder Case : डॉक्टरांच्या संपामुळं अनेक राज्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. त्याबाबत केंद्र सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. सर्व राज्यांतील कायदा आणि सुव्यवस्थेवर केंद्र सरकार आता लक्ष ठेवणार आहे. यासाठी गृह मंत्रालयानं शनिवारी (17 ऑगस्ट) आदेश जारी केला.
केंद्रानं मागवला अहवाल : कोलकाता येथील डॉक्टर तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेवरुन देशभरात संतापाची लाट उसळली आहे. विविध राज्यातील डॉक्टर संघटना संपावर गेल्या आहेत. त्यामुळं वैद्यकीय सेवेवर परिणाम झाला असल्याचं चित्र दिसत आहे. अशातच काही ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. याची आता केंद्र सरकारनं गंभीर दखल घेतली.
प्रत्येक दोन तासाला अहवाल द्यावा लागेल : यासाठी गृह मंत्रालयानं शनिवारी (17 ऑगस्ट) आदेश जारी केला. सर्व राज्यांनी दर दोन तासांनी कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती केंद्राला द्यावी लागेल. त्यामुळं आतापासून सर्व राज्य दर दोन तासांनी परिस्थितीचा अहवाल गृह मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाला फॅक्स, ई-मेल किंवा व्हॉट्सॲपद्वारे पाठवतील, असं गृह विभागानं आदेशात म्हटलं आहे. केंद्रानं शुक्रवारी (16 ऑगस्ट) दुपारी 4 वाजेपासून या आदेशाची अंमलबजावणी केली आहे.