मुंबई : विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला केवळ 20 जागाच जिंकता आल्या. कोकण, मराठवाड्यासह इतर भागात ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाले. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल बोलताना भाजपाच्या खासदार कंगना रणौत यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली.
महायुती सरकारचं कौतुक : माध्यमांशी बोलताना खासदार कंगना रणौत यांनी भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या विजयाबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. "विधानसभा निवडणुकीत मिळालेला विजय ऐतिहासिक आहे. सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. महाराष्ट्रातील जनतेचे आम्ही ऋणी आहोत. महायुती सरकारनं राज्यातील महिलांना 33 टक्के आरक्षण, मोफत धान्य, गॅस सिलेंडरची योजना सुरू केली," असं म्हणत त्यांनी महायुती सरकारचं कौतुक केलं.
महिलांचा अपमान करणाऱ्यांचा पराभव : उद्धव ठाकरेंचा इतका वाईट पराभव होईल याची तुम्हाला अपेक्षा होती का? असा प्रश्न विचारला असता कंगना म्हणाल्या, "महिलांचा अपमान करणाऱ्यांचा पराभव झाला. त्यांनी माझं घर फोडलं आणि माझ्याविरुद्ध अपशब्द वापरले. याचे परिणाम त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भोगावे लागले."