श्रीनगर : जम्मू-काश्मीर विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान (Jammu and Kashmir Assembly Session) चौथ्या दिवशी प्रचंड गदारोळ झाला. विधानसभेत सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधकांमध्ये जोरदार बाचाबाची आणि हाणामारी झाली. मिळालेल्या माहितीनुसार, कलम 370 मागे घेण्याच्या प्रस्तावावरून हा गोंधळ सुरू राहीला.
नेमकं काय घडलं? : आज (7 नोव्हेंबर) बारामुल्लाचे लोकसभा खासदार, अभियंता रशीद यांचे बंधू आमदार खुर्शीद अहमद शेख यांनी कलम 370 चं बॅनर दाखवल्यानं गोंधळ झाला. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बाचाबाची सुरू झाली. सभागृहातील विरोधी पक्षनेते आणि भाजपाचे आमदार सुनील शर्मा यांनी या प्रस्तावाला विरोध केला. खुर्शीद अहमद शेख हे लंगेट विधानसभा मतदारसंघातून अवामी इत्तेहाद पक्षाचे आमदार आहेत.
कलम 370 वरुन जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ (ETV Bharat) सभागृहात घोषणाबाजी : विधानसभेतील हा गोंधळ इतका वाढला की यामध्ये सभागृहाच्या मार्शलला हस्तक्षेप करावा लागला. यानंतर सभागृहाचं कामकाज काही काळासाठी थांबवावं लागलं. त्याचवेळी सभागृहात झालेल्या गदारोळात धार्मिक घोषणाही दिल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, पीडीपीनं जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम 370 आणि 35 अ पुनर्स्थापित करण्याची मागणी करणारा नवीन ठराव मांडला आहे.
रवींद्र रैना यांनी एनसीवर निशाणा साधला : कलम ३७० पुन्हा लागू करण्याच्या मुद्द्यावरुन भारतीय जनता पक्षाचे नेते रवींद्र रैना यांनी नॅशनल कॉन्फरन्स सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, "कलम 370 आता इतिहास जमा झाले आहे. ते परत आणता येत नाही. ओमर अब्दुल्ला सरकार सतत पाकिस्तानला प्रोत्साहन देतंय. कलम 370 ने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद, फुटीरतावाद आणि पाकिस्तानी मानसिकतेला प्रोत्साहन दिलंय. अशा परिस्थितीत कलम 370 चा प्रस्ताव सभागृहात मांडणं म्हणजे या सरकारला आणि काँग्रेसला पुन्हा रक्तपात वाढवायचा आहे, हेच दिसून येते. नॅशनल कॉन्फरन्स सरकारनं भारत मातेच्या पाठीत खंजीर खुपसलाय", अशी टीका रवींद्र रैना यांनी केली आहे.
हेही वाचा -
- तब्बल इतक्या वर्षानंतर जम्मू काश्मीर विधानसभेचं होत आहे अधिवेशन; आज अध्यक्षांची होणार निवड
- काश्मीरचे राजकारण: अब्दुल्ला पुन्हा आघाडीवर, अनिश्चितता आणि गोंधळाची परिस्थिती कायम