मुंबई International Labour Day 2024 :आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा 1 मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस मे दिवस, कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. हा दिवस कामगारांचे हक्क, न्याय आणि कामाच्या परिस्थितीबद्दल बोलणे, समस्या जाणून घेणे आणि सुधारणा करण्याशी संबंधित आहे. दरवर्षी आंतरराष्ट्रीय कामगार दिनासाठी एक विशेष थीम निवडली जाते. हवामान बदलादरम्यान कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्य सुनिश्चित करणे ही यावर्षीची थीम आहे. या थीमद्वारे कामगारांचे आरोग्य आणि सुरक्षिततेवर भर दिला जाणार आहे.
कामगार दिवसाचा इतिहास :1886 साली कामगारांनी कामाच्या वेळेवरून आंदोलन केल्यावर या दिवसाची सुरुवात झाली. त्या काळात मजुरांना प्रत्येकी 15 तास काम करावं लागत होतं. 1886 मध्ये शिकागोच्या मार्केटमध्ये दंगल झाली आणि यानंतर 15 तासांच्या कामाच्या शिफ्टमध्ये एका कामगारांचा मृत्यू झाला. या दिवशी लाखोंच्या संख्येने लोक रस्त्यावर आले. यानंतर कामाचे तास 8 तास असावे आणि आठवड्यातून एक सुट्टी द्यावी, अशी मागणी या लोकांनी केली होती. या संपादरम्यान कामगार आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. या चकमकीत पोलिसांसह अनेक कामगारांचा मृत्यू झाला. यानंतर 1 मे 1889 रोजी एक बैठक झाली आणि हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.