मुंबई :प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (ratan tata death)यांचं आज निधन झालंय. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते आणि त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. वाढत्या वयामुळे त्यांना अनेक आजाराच्या समस्या होत्या. त्यांना देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न देण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. देशभरातील लोकांमध्ये रतन टाटा यांच्याबद्दल नितांत आदर होता. टाटा समूहाने रतन टाटा यांच्या निधनाची माहिती दिली आहे.
कधीही भरून न निघणारं नुकसान :टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखर यांनी यावेळी एक निवेदन जारी केलंय. ते म्हणाले, 'आम्हाला रतन नवल टाटा यांना निरोप देताना मोठं दुःख होत असून, कधीही भरून न निघणारं नुकसान आहे. एक असामान्य नेता ज्यांच्या अतुलनीय योगदानाने केवळ टाटा समूहालाच आकार दिला नाही, तर आपल्या राष्ट्राच्या जडणघडणीतही हातभार लावला. टाटा समूहासाठी रतन टाटा हे चेअरपर्सनपेक्षा मोठे होते. माझ्यासाठी ते गुरू, मार्गदर्शक आणि मित्रही होते, अशा भावनाही एन चंद्रशेखर यांनी व्यक्त केल्या. रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने नावीन्यता, सचोटी आणि नवसंकल्पनांनी विस्तार केलाय. रतन टाटा यांची परोपकार करण्याची भावना आणि समाजाच्या विकासाप्रति असलेले समर्पण हे वाखाणण्याजोगे होते. रतन टाटांनी देशातील तरुणांप्रति अन् राष्ट्राप्रति घेतलेल्या पुढाकाराने लाखो लोकांच्या जीवनात शिक्षणापासून ते आरोग्यसेवेपर्यंत आमूलाग्र बदल झालेत. त्याचा पुढच्या पिढ्यांनाही फायदा होणार आहे. पूर्ण टाटा परिवाराच्या वतीने मी त्यांच्याप्रति संवेदना व्यक्त करतो. त्यांचा वारसा आम्हाला कायम प्रेरणा देत राहील, कारण आम्ही त्यांची तत्त्वे जपण्याचा प्रयत्न करतोय, असंही एन चंद्रशेखर म्हणालेत.
2000 साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित : रतन टाटा यांचं सामाजिक कार्य लक्षात घेता भारत सरकारने त्यांना 2000 साली पद्मभूषण पुरस्काराने गौरवले होते. मात्र, उद्योगपती असले तरी त्यांचे सामाजिक कार्य इतके मोठे होते की, 2008 मध्ये भारत सरकारने पुन्हा एकदा त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले. रतन टाटा यांच्या निधनाने देशातील तरुण उद्योजकांनी एक मोठा खंबीर आधार गमावलाय. त्यांनी वैयक्तिक क्षमतेनुसार अनेक स्टार्टअप्समध्ये पैसे गुंतवले होते. त्यांनी लेन्सकार्ट, अर्बन कंपनी, फर्स्टक्राय, ओला, ओला इलेक्ट्रिक, अपस्टॉक्स, कार देखो अशा 45 स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली होती. टाटा यांच्या याच तरुण उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या सवयीमुळे अनेक तरुण आपल्या नवनवीन कल्पनांसह उद्योग क्षेत्रात उतरले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या X हँडलवर पोस्ट करून रतन टाटा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. पीएम मोदी म्हणाले की, 'रतन टाटाजी एक दूरदर्शी व्यावसायिक, एक दयाळू आत्मा आणि एक विलक्षण माणूस होते. त्यांनी भारतातील सर्वात जुन्या आणि सर्वात प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्याला स्थिर नेतृत्व दिले. खरं तर त्यांचं योगदान बोर्डरूमपर्यंत न राहता त्या पलीकडे गेले. नम्रता, दयाळूपणा अन् समाजात सुधारणा करण्याच्या अतूट बांधिलकीमुळे रतन टाटा लोकांच्या पसंतीस उतरले. रतन टाटांची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यांना मोठी स्वप्ने पाहण्याची आवड होती. शिक्षण, आरोग्य सेवा, स्वच्छता यांसारख्या काही सेवांमध्ये सुधारणा घडवण्यासाठी ते आघाडीवर असत. रतन टाटा यांच्याशी झालेल्या असंख्य संभाषणांच्या आठवणीनं माझं मन भरून आलंय. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना त्यांना अनेकदा भेटायचो. आम्ही विविध मुद्द्यांवर विचार विनिमय आणि चर्चा करायचो. मला त्यांचा दृष्टिकोन खूप समृद्ध वाटला. मी दिल्लीला आलो, तेव्हाही हा संवाद सुरूच होता. त्यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झालंय. या दु:खाच्या वेळी त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांसोबत आहेत. ओम शांती.'