जैसलमेर Vayu Shakti 2024 : भारतीय हवाई दलानं शनिवारी (17 फेब्रुवारी) जैसलमेरजवळील चंदन फील्ड फायरिंग रेंजवर ‘वायुशक्ती-2024’ अंतर्गत युद्ध आणि हल्ला करण्याच्या क्षमतांचं प्रदर्शन केलं. वायु शक्ती 2024 मध्ये, हवाई दलाच्या 120 हून अधिक लढाऊ विमानांनी त्यांची ताकद आणि आक्रमक क्षमता दाखवली. जैसलमेरच्या चांदन फील्ड फायरिंग रेंजमध्ये वायु शक्ती 2024 सराव सुरू होताच फील्ड फायरिंग रेंजचे दृश्य एखाद्या युद्धभूमीसारखे भासत होते. यावेळी हवाई दलाच्या लढाऊ हेलिकॉप्टर क्षेपणास्त्रांच्या जोरदार स्फोटांनी आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या कडकडाटाने चांदण रेंज दुमदुमली. या कार्यक्रमात देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांच्यासह हवाई दलाचे प्रमुख आणि नौदल प्रमुखही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
लाइटनिंग स्ट्राइक फ्रॉम द स्काय : वायु शक्ती 2024 सरावाची सुरुवात राष्ट्रगीत आणि हवाई योद्धांनी चेतक हेलिकॉप्टरमधून राष्ट्रध्वज आणि भारतीय वायुसेनेचा ध्वज फडकावून केली. यानंतर राफेल विमानानं सोनिक बूम केलं. दोन जॅग्वार विमानांनी खालच्या स्तरावर उड्डाण केले. त्यानंतर राफेलचा पाठलाग केला. 'लाइटनिंग स्ट्राइक फ्रॉम द स्काय' या सरावाची यावर्षीची थीम पाळत, 120 हून अधिक विमानांनी दिवसा आणि रात्री एलएएफच्या क्षमतांचं प्रदर्शन केलं.
पारंपारिक बॉम्ब आणि रॉकेटचा वापर: राफेल, एसयू-30 एमकेआई, मिग-29, मिराज-2000, तेजस आणि हॉक या भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी जमिनीवर आणि हवेतील शत्रूच्या सिम्युलेटेड लक्ष्यांवर प्राणघातक अचूकतेनं हल्ला करून नष्ट केलं. हे हल्ले विविध पद्धती आणि दिशानिर्देशांमध्ये केले गेले. आत्मनिर्भर भारताप्रती एलएएफची दृढ वचनबद्धता कायम ठेवत, स्वदेशी बनावटीच्या तेजस विमानाने स्विंग रोल क्षमतेचे प्रदर्शन केलं. तसंच क्षेपणास्त्राने हवाई लक्ष्य नष्ट केले. यानंतर जमिनीवरील लक्ष्यावर बॉम्ब हल्ला करण्यात आला.