नवी दिल्ली : भारत आणि चीननं आपलं सैन्य मागे घेण्यासंदर्भात आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पुन्हा गस्त सुरू करण्यासाठी नवीन करार केलाय. अहवालानुसार, हा करार डेपसांग आणि डेमचोक भागात गस्त घालण्याशी संबंधित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डेपसांग आणि डेमचोक या दोन्ही ठिकाणी गस्त सुरू झाली आहे. लवकरच दोन्ही देश आपलं सैन्य मागे घेण्यास सुरुवात करतील. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी सोमवारी (21 ऑक्टोबर) यासंदर्भात माहिती दिली.
काय म्हणाले परराष्ट्र सचिव? : परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी सांगितलं की, "या घडामोडीनं सीमेवरील तणाव कमी होण्याची अपेक्षा आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून सुरू असलेल्या चर्चेमुळं भारत-चीन सीमा भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालण्याच्या व्यवस्थेवर एक करार झालाय. यामुळं सैन्य मागे घेतलं जातंय. 2020 मध्ये या भागात निर्माण झालेल्या समस्यांचं निराकरण करण्यात येत आहे. सीमेवरील उर्वरित प्रश्न सोडवण्यासाठी भारत आणि चीनकडून प्रयत्न सुरू आहेत."
गौतम बंबावले यांची प्रतिक्रिया : या करारासंदर्भात माध्यमांशी संवाद साधत असताना चीनमधील माजी भारतीय राजदूत गौतम बंबावले म्हणाले की, "मला वाटतं की ही एक अतिशय स्वागतार्ह घटना आहे. याबद्दल भारत सरकारचं या विषयावर ठोस भूमिका घेतल्याबद्दल अभिनंदन केले पाहिजे. भारत आणि चिनी सैन्यांमधील 4.5 वर्षांच्या संघर्षानंतर भारताच्या भूमिकेला पुष्टी मिळाली आहे. भारतीय आणि चिनी सैन्यामधील परिस्थिती पूर्वस्थिती पूर्ववत झाली असेल तर आम्ही निश्चितपणे या कराराचं स्वागत करतो", असं ते म्हणाले.
ब्रिक्स परिषदेत मोदी-शी जिनपिंग भेटणार? :चीनसोबतच्या झालेल्या कराराबाबतची ही माहिती ब्रिक्स परिषदेच्या एक दिवस अगोदर आली. या शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे द्विपक्षीय बैठकाही घेऊ शकतात. परराष्ट्र मंत्रालयाकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु, ब्रिक्स परिषदेच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची द्विपक्षीय बैठक होण्याची दाट शक्यता आहे.
हेही वाचा -
- इमर्जन्सी लँडींगनंतर चीन सीमेवरील गावात अडकले मुख्य निवडणूक आयुक्त; गावात ना वीज, ना फोन अंधारात जागून काढली रात्र
- भारत आणि चीन यांच्यातील एलएसीबाबत चर्चेतून तोडगा निघेल का, एक विवेचन... - LAC Between India And China
- चिनी आक्रमणाचे दुष्परिणाम नेहरुंच्या काळातीलच, विरोधकांचे आरोप खोटे; परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचा दावा - S Jaishankar