मुंबई- विधानसभा निवडणुकीत सपाटून पराभव झालेल्या महाविकास आघाडीनं ईव्हीएमच्या कथित गैरवापराविरोधात थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती राष्ट्रवादीचे (एसपी) नेते प्रशांत जगताप यांनी दिली.
भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीच्या विजयासाठी ईव्हीएममध्ये कथित फेरफार झाल्याचा महाविकास आघाडीकडून आरोप करण्यात आला. मंगळवारी दिल्लीत राष्ट्रवादीचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार, आपचे संयोजक अरविंद केजरीवाल आणि सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील अभिषेक सिंघवी यांच्यात मंगळवारी शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीनं ईव्हीएममधील कथित फेरफाराविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राष्ट्रवादीचे (एसपी) प्रशांत जगताप यांनी दिली. प्रशांत जगताप यांचा विधानसभा निवडणुकीत हडपसर विधानसभा मतदारसंघात पराभव झाला. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या राष्ट्रवादीच्या (एसपी) काही नेत्यांनी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
भाजपाच्या नेतृत्वाखाली महायुतीला विजयी करण्यासाठी घोटाळा झाला. यामध्ये मतांचे प्रमाण वाढविणे, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमध्ये छेडछाड करण्याचा समावेश आहे. इंडिया आघाडीतील सर्व पक्ष न्यायालयात जाणार आहेत. आमचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे-प्रशांत जगताप, राष्ट्रवादी(एसपी) नेते
बैठकीला खासदार सुप्रिया सुळे यादेखील हजर होत्या. त्यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटलं, "शरद पवार हे अत्यंत महत्त्वाच्या बैठकीत आहेत. या बैठकीत अरविंद केजरीवाल, संजय सिंह, राष्ट्रवादीचे (एसपी) आमदार आणि खासदार, विधानसभा निवडणुकीतील उमेदवार उपस्थित आहेत. देशावर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू आहे. त्यादृष्टीनं पुढील रणनीती करण्यात येत आहे".
निवडणूक आयोगानं फेटाळले आरोप-महाविकास आघाडीकडून ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा आरोप होताना निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण दिलं आहे. मतमोजणीच्या दिवशी एकूण 1445 व्हीव्हीपॅट स्लिप्सची मोजणी करण्यात आली. त्यांच्याशी संबंधित ईव्हीएम क्रमांकांशी जुळणाऱ्या कोणत्याही व्हीव्हीपॅट स्लिपमध्ये कोणतीही तफावत आढळली नाही. ईव्हीएमचे कोणत्याही प्रकारे हॅकिंग शक्य नसल्याचंही स्पष्टीकरण निवडणूक आयोगानं दिलं आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक विजय-विधानसभा निवडणुकीत महायुती आघाडीनं एकूण 235 जागा जिंकल्या आहेत. राज्यामधील विधानसभा निवडणुकीत आजपर्यंत कोणत्याही आघाडीला एवढे बहुमत मिळालं नाही. या निवडणुकीत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात अशा दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. तर महाविकास आघाडीला 46 जागांवर समाधान मानाव लागलं आहे.
हेही वाचा-
- "ईव्हीएममध्ये कोणतीही हॅकिंग शक्य नाही, कारणं..." निवडणूक आयोगाकडून विरोधकांच्या आरोपावर स्पष्टीकरण
- ठाकरेंच्या शिवसेनेकडून ईव्हीएम विरोधात आंदोलन, प्रतिकृतीचं समुद्रात केलं विसर्जन
- पुन्हा एकदा 'भारत जोडो'! यावेळी बॅलेट पेपरसाठी