नवी दिल्ली Congress BJP on Hindenburg Report : अमेरिकन शॉर्ट-सेलर कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चनं बाजार नियामक सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांचा ऑफशोअर फंडात भागीदारी असल्याचा आरोप केलाय. तसंच या फंडातील 7,72,762 डॉलर एवढी रक्कम गौतम अदानी यांचे बंधू विनोद अदानी यांनी वापरल्याचा दावा करण्यात आलाय.
सेबी-अदानी प्रकरणाची जेपीसी चौकशी करण्यात यावी : हिंडेनबर्गच्या अहवालानंतर काँग्रेसनं या प्रकरणाची संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) चौकशी करण्याची मागणी केलीय. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी एक्सवर एका पोस्टमध्ये म्हटलंय की, "हिंडनबर्गच्या जानेवारी 2023 च्या खुलाशांमध्ये सेबीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जवळचे मित्र अदानी यांना सर्वोच्च न्यायालयासमोर क्लीन चिट दिली होती. आज त्याच सेबी प्रमुखाचे तथाकथित आर्थिक संबंध उघड झाले आहेत. मध्यमवर्गातील लहान आणि मध्यम गुंतवणूकदा हे त्यांच्या कष्टानं कमावलेले पैसे शेअर बाजारात गुंतवतात. त्यांना संरक्षण मिळणं आवश्यक आहे. कारण त्यांचा सेबीवर विश्वास आहे. जोपर्यंत या महाघोटाळ्याची JPC चौकशी होत नाही, तोपर्यंत मोदी आपल्या A1 मित्राला मदत करत राहतील. त्यातून देशाच्या घटनात्मक संस्थांचे तुकडे होत राहतील."
राहुल गांधी काय म्हणाले? :याप्रकरणी कॉंग्रेस नेते राहुल गांधींनीही एक्सवर पोस्ट करत मोदी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. ते म्हणालेत की, " देशभरातील प्रामाणिक गुंतवणूकदारांचे सरकारसाठी काही गंभीर प्रश्न आहेत. सेबीच्या चेअरपर्सन माधवी पुरी बुच यांनी अद्याप राजीनामा का दिला नाही?, गुंतवणुकदारांनी कष्टानं कमावलेला पैसा गमावला तर कोणाला जबाबदार धरले जाईल- पंतप्रधान मोदी, सेबी अध्यक्ष की गौतम अदानी?, समोर आलेल्या नवीन आणि अत्यंत गंभीर आरोपांच्या प्रकाशात सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात पुन्हा एकदा स्वत: लक्ष देईल का? पंतप्रधान मोदी जेपीसी चौकशीला इतके का घाबरतात हे आता स्पष्ट झालंय", असं राहुल म्हणाले.