नवी दिल्ली Hemant Soren ED Inquiry : अंमलबजावणी संचालनालयानं झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील निवासस्थानी छापेमारी केली. कथित मनी लाँड्रींग प्रकरणी ही चौकशी करण्यात आली आहे. ईडीचे अधिकारी हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील घरी तब्बल 13 तास तळ ठोकून होते. यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी हेमंत सोरेन यांची बीएमडब्लू कारही जप्त केली आहे.
हेमंत सोरेन यांची बीएमडब्लू कार केली जप्त :अंमलबजावणी संचालनालयानं हेमंत सोरेन यांना अनेकवेळा समन्स बजावूनही ते चौकशीला हजर राहिले नाहीत. त्यामुळं ते बेपत्ता असल्याचं स्पष्ट करत त्यांच्या घराची ईडीच्या अधिकाऱ्यांनी झाडाझडती घेतली. ईडीचे अधिकारी त्यांच्या दिल्लीतील घरी सकाळी 9 वाजताच्या दरम्यान पोहोचले. यावेळी अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरातून रात्री साडेदहा वाजता काढता पाय घेतला. मात्र यावेळी अधिकाऱ्यांनी हेमंत सोरेन यांची बीएमडब्लू कार जप्त केली.
हेमंत सोरेन यांच्या घरातून कागदपत्र जप्त केल्याचा दावा :ईडीचे अधिकारी सकाळी 9 वाजताच्या दरम्यान हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील घरी दाखल झाले होते. यावेळी अधिकाऱ्यांनी दक्षिण दिल्लीतील 5/1 शांतीनिकेतन इमारतीत पोहोचले. अधिकाऱ्यांनी घरातून कागदपत्र मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी हेमंत सोरेन यांची बीएमडब्लू कार जप्त केल्याची माहितीही यावेळी सूत्रांनी दिली.