जयपूर Heavy Rains Lash Parts Of Rajasthan : मुसळधार पावसानं राजस्थानमध्ये हाहाकार उडवला असून विविध घटनांमध्ये आतापर्यंत तब्बल 19 नागरिकांचा बळी गेला आहे. यात घर कोसळल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. त्यासह कनोटा धरणात बुडून रविवारी 5 तरुणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत सहायक पोलीस आयुक्त मुकेश चौधरी यांनी ईटीव्ही भारत प्रतिनिधीला सांगितलं की, "कनोटा धरणावर सहा तरुण पिकनिकसाठी आल्यानंतर आंघोळीसाठी ते पाण्यात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं अखेर पाच जण बुडाले गेले. त्यापैकी एका तरुणाला बचावण्यात आलं आहे."
कनोटा धरणात पाच तरुण गेले वाहून :कनोटा धरणात पाच तरुणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच मोठी खळबळ उडाली. प्रशासनानं राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) आणि नागरी संरक्षण दलांनी शोध मोहीम सुरू केली. अथक शोधमोहिमेनंतर या तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश जवानांना यश आलं. हर्षा नागोरा (20), विनय मीना (22), विवेक माहोर (22), अजय माहोर (22) आणि हरकेश मीना (24) अशी मृतांची नावं असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेतील मृत तरुणांपैकी तिघं शास्त्रीनगर इथले रहिवासी असून एक दादी का फाटक तर दुसरा नई की थडी इथला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एकाच कुटुंबातील सात तरुणांचा बुडून मृत्यू :एकाच कुटुंबातील सात जण नदीत आंघोळ करताना बुडाल्याची घटना भरतपूर इथं घडल्यानं मोठी खळबळ उडाली. बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली. याबाबत माहिती देताना एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, श्रीनगर गावातील आठ जण भरतपूर इथल्या बाणगंगा नदीत स्नान करत होते. मात्र यावेळी पाण्याचा अंदाज न आल्यानं ते खोल पाण्यात गेले. त्यानंतर एकापोठोपाठ एक करत बुडाले. यात पवनसिंग जाटव (20), सौरभ जाटव (18), गौरव जाटव (16), भूपेंद्र जाटव (18), शंतनू जाटव (18), लक्की जाटव (20) आणि पवन जाटव (22) अशी मृतांची नावं असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
मुसळधार पावसाचा फटका, आज चार जिल्ह्यांतील शाळा बंद :राजस्थानात पावसानं हाहाकार उडवल्यानं मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी इथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी चार बाधित जिल्ह्यांतील सर्व शाळा सोमवारी बंद ठेवण्याचे निर्देश दिले. रविवारी मुख्यमंत्री कार्यालयात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी अधिकाऱ्यांना बाधित भागात मदतकार्य जलद करण्याच्या सूचना दिल्या. बचाव कार्याला गती देण्यासाठी संबंधित विभागांच्या संयुक्त पथकांची स्थापना करण्यात यावी. भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या इशाऱ्यानुसार उपाययोजना करण्यास सांगितलं, अशी माहिती सूत्रांनी दिली. राजस्थानातील सवाई माधोपूर, करौली, भरतपूर आणि दौसा जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी सर्व सरकारी आणि खासगी शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.