नवी दिल्ली Halwa Ceremony :येत्या 1 फेब्रुवारीला केंद्रातील मोदी सरकारचा दहावा आणि लोकसभा निवडणुकीपूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यापूर्वी 24 जानेवारीला नवी दिल्लीतील नॉर्थ ब्लॉकमध्ये 'हलवा समारंभ' पार पडला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत या समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं.
हलवा समारंभ म्हणजे काय : दरवर्षी, संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी हलवा समारंभ आयोजित करण्याची परंपरा आहे. अर्थसंकल्पाची छपाई पूर्ण झाल्यानंतर जेव्हा ते 'लॉक-इन' केलं जातं, तेव्हा अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील कर्मचारी आणि अधिकारी एक विशेष प्रकारचा समारंभ आयोजित करतात. याला 'हलवा समारंभ' असं म्हणतात. आपल्या भारतीय परंपरेत कोणतंही शुभ कार्य करण्यापूर्वी काहीतरी गोड खाण्याची परंपरा आहे. म्हणूनच अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थ मंत्रालयाकडून हलवा एका मोठ्या पातेल्यात तयार केला जातो आणि संसदेत सर्वांना दिला जातो. या वेळी अर्थमंत्र्यांच्या देखरेखीखाली काम करणाऱ्या कोअर टीमचे सदस्य आणि अधिकारीही उपस्थित असतात.