रायपूर : झारखंड आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि छत्तीसगडचे माजी उपमुख्यमंत्री टी एस सिंहदेव यांच्याकडे छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या जाहीरनाम्याची जबाबदारी देण्यात आलीय. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची रणनीती काय असेल? याबाबत टी एस सिंहदेव यांनी 'ईटीव्ही भारत'शी खास संवाद साधला.
मजबूत रणनीती बनवण्याची गरज :"यापूर्वी लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीच्यावेळी ज्या राजकीय पक्षांची युती होती ते निवडणुका संपल्यानंतर युती करत असत. प्रत्येक पक्ष आपापला जाहीरनामा तयार करत असे. प्रत्येकजण आपापल्या जाहीरनाम्यावर निवडणूक लढवायचा. मात्र, यावेळी तसं नसून महाराष्ट्रात जो कोणी युतीमध्ये सहभागी असेल त्याचा संयुक्त जाहीरनामा काढू. पुढील 5 वर्ष काम कसं करायचं याचा संपूर्ण तपशील जाहीरनाम्यात असणार. त्यात बदल करण्याबाबत कोणताही राजकीय पक्ष बोलू शकत नाही. कारण आता भाजपा पक्षानं ज्या पद्धतीनं रणनीती बनवली आहे, त्याला सामोरं जाण्यासाठी मोठी आणि मजबूत रणनीती बनवण्याची गरज आहे. यावर आम्ही काम करत आहोत. या निवडणुकीत आम्ही सर्व राजकीय पक्षांना सोबत घेऊन जाहीरनामा जारी करणार आहोत. जेणेकरून ही निवडणूक एकजुटीनं लढलेली निवडणूक असल्याचं जनतेला सांगता येईल. जाहीरनाम्यात नंतर कोणताही बदल करता येणार नाही," असं टी एस सिंहदेव यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.