सिलीगुडी (पश्चिम बंगाल) Snake Venom Smuggling :पश्चिम बंगाल वन विभागाला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. कुर्सियांग वन्यजीव वन विभाग, बागडोगरा रेंज आणि वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोच्या संयुक्त कारवाईत सुमारे 4 किलो सापाचे विष जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या सापाच्या विषाची अंदाजे बाजारातील किंमत सुमारे 5 कोटी रुपये आहे.
'हे' आहेत ते तीन आरोपी : गेल्या काही महिन्यांत अशाच प्रकारच्या घटना घडल्यानं वनविभागाच्या अधिकारी सतर्क झाले आहेत. यापूर्वी 16 ऑक्टोबर आणि 30 डिसेंबर रोजी, वनविभागाने सिलीगुडीला कॉरिडॉर म्हणून वापरून काही कोटी रुपयांच्या सापांच्या विषाच्या तस्करीचे मनसुबे उधळून लावले होते. वन विभाग आणि गुन्हे नियंत्रण ब्युरोच्या सूत्रांनुसार, वन विभागानं तिघांना अटक केली आहे. यामध्ये मोहम्मद शाहनवाज (27), मोहम्मद तौहीद आलम (३९), मोहम्मद अजमल (28) यांचा समावेश आहेत. सर्व आरोपी उत्तर दिनाजपूरमधील इस्लामपूरचे रहिवासी आहेत. अटक केलेल्यांना बुधवारी सिलीगुडी उपविभागीय न्यायालयात हजर केले जाणार आहे.
अटकेतील आरोपींची होणार चौकशी : "सापाच्या विषाच्या तस्करी प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. सर्व गोष्टींचा तपास सुरू आहे," असे मुख्य वन अधिकारी (वन्यजीव) नीरज सिंघल यांनी या संदर्भात सांगितले. बागडोगरा रेंजर सोनम भुतिया यांनी सांगितले की, "अटक झालेल्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले जाईल. या रॅकेटमध्ये आणखी कोणी सामील आहे का, याचा शोध घेतला जात आहे." वनविभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन स्पेशल जारमध्ये सापाचे विष आढळून आले. फ्रान्समध्ये बनवलेल्या काचेच्या जारपैकी एकामध्ये 1 किलो 796 ग्रॅम आणि दुसऱ्यामध्ये 2 किलो 29 ग्रॅम सापाचे विष होते.