नवी दिल्ली Farmers Protest Update : पंजाब आणि हरियाणाच्या सीमेवर आंदोलक शेतकरी आजही ठाण मांडून कायम आहेत. दरम्यान, येत्या काही दिवसांत 'दिल्ली चलो मार्च' काढण्यात येणार असल्याचं शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांनी सांगितलं आहे. ते आज (3 मार्च) माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे.
देशातील शेतकरी आंदोलनात सहभागी होतील :"आम्ही शेतकरी आहोत. आम्ही काही दहशतवादी नाहीत. मात्र, पोलीस आमच्यावर गोळीबार करत आहेत. आम्हाला मध्येच अडवलं जातंय. अनेक सीमा सील केल्या आहेत. परंतु, हे सगळं झालं असलं तरी आम्ही आमचा दिल्लीला जाण्याचा कार्यक्रम रद्द केलेला नाही. कोणतीही स्थिती आली तरी आम्ही दिल्लीला जाणार आहोत," असंही शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल म्हणाले आहेत. तसंच, आमच्या मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण देशातील शेतकरी या आंदोलनात सहभागी होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय.
पंजाबच्या खनौरी आणि शंभू सीमेवर आंदोलन : "येत्या 10 मार्चला आमचे देशभरात सकाळी 12 ते दुपारी 4 या वेळेत रेल्वे रोको आंदोलन होणार आहे. 13 फेब्रुवारीला शेतकऱ्यांना दिल्ली चलो मोर्चा काढण्यापासून रोखण्यात आलं होतं. तेव्हापासून हरियाणाच्या सीमेला लागून असलेल्या पंजाबच्या खनौरी आणि शंभू सीमेवर शेतकरी ठाण मांडून आहेत," अशी माहितीही जगजित सिंग डल्लेवाल यांनी दिली.
महापंचायत होणार : केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी 14 मार्च रोजी दिल्लीत किसान महापंचायत होणार आहे. संयुक्त किसान मोर्चाने शनिवारी (2 मार्च) सांगितलं की, "400 पेक्षा अधिक शेतकरी संघटना 'महापंचायत'मध्ये सहभागी होतील. तसंच, संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चा यांना सर्व शेतकरी संघटना आणि संघटनांमध्ये समस्या-आधारित ऐक्याचं आवाहन करणारा ठराव पाठवला आहे," असंही संयुक्त किसान मोर्चानं सांगितलं आहे.