चंदीगड/अंबाला : हरियाणा आणि पंजाबच्या शंभू सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी आज (8 डिसेंबर) पुन्हा एकदा दिल्लीकडं कूच करणार आहेत. शेतकरी नेते सर्वन सिंह पंढेर म्हणाले की, "6 डिसेंबरलाही आम्ही दिल्लीकडं मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी आम्हाला पुढं जाऊ दिलं नाही." यावेळी शेतकऱ्यांची पोलिसांशी झटापट झाली. यात 16 शेतकरी जखमी झाले आहेत. किरकोळ जखमी झालेल्या शेतकऱ्यांसह 25 पेक्षा जास्त शेतकरी जखमी झाले आहेत.
शेतकरी पुन्हा दिल्लीकडं कूच करणार : शेतकरी नेत्यानं सांगितले की, "जखमी झालेल्या एका शेतकऱ्याची श्रवणशक्ती कमी झाली आहे. पोलीस-प्रशासनात कोणताही संघर्ष आम्हाला नको आहे, असं ते म्हणाले. त्यामुळं आम्ही 6 डिसेंबरचा दिल्लीचा मोर्चा स्थगित करून सरकारला चर्चेसाठी वेळ दिला होता. मात्र, सरकारनं चर्चेचा कोणताही प्रस्ताव दिला नाही. त्यानंतर 8 डिसेंबरला म्हणजेच आज दुपारी 12 वाजता 101 शेतकरी दिल्लीला रवाना होणार आहेत".
काय म्हणाले सर्वन सिंह पंढेर? : शंभू सीमेवर शेतकरी नेते सर्वन सिंह पंढेर म्हणाले, "किसान मजदूर मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चाचे आंदोलन 300 व्या दिवसात पोहोचलं आहे. मात्र, केंद्र सरकार अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. आम्ही आणखी एक मोठी घोषणा केली की, आम्ही पंजाबमध्ये भाजपाला विरोध करणार आहोत. मात्र, हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अमृतसरला जात असल्याचं आम्ही ऐकलंय. आम्ही पंजाबमधील शेतकऱ्यांना त्यांच्या राज्यात प्रवेश करण्यास विरोध करण्याचं आवाहन करतो.”
- शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सुरक्षा व्यवस्था कडक : हरियाणा पंजाब आणि हरियाणा दिल्ली सीमेवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना पुढं जाण्यापासून रोखण्याकरिता बॅरिकेड लावण्यात आलं आहे.
दातासिंहवाला सीमेवरही सुरक्षा कडक : जींद आणि पंजाबच्या दातासिंहवाला सीमेवरही सुरक्षा कडक करण्यात आली आहे. दातासिंह सीमा सध्या सील करण्यात आली असून शेतकऱ्यांचा दिल्लीकडं मोर्चा पाहता फौजफाटा वाढवण्यात आलाय. याशिवाय उढाणा आणि नरवाना कालव्यातील ब्लॉक काढण्यात आलेत. तर उझाना आणि नरवाना सिरसा शाखा कालव्यावर नाकाबंदी करण्यात आली आहे.