हैदराबाद Poonam Pandey Death News: एखाद्या सेलिब्रेटीचा आकस्मिक मृत्यू धक्कादायक आणि तितकाच लक्ष वेधून घेणारा असू शकतो. त्यातही कॅन्सरसारख्या संवेदनशील विषयावर अभिनेत्री मृत्यूचा खोटारडेपणा करते तेव्हा ते अधिक धक्कादायक असते. मॉडेल पूनम पांडेनं नुकताच सर्वायकल कॅन्सरच्या जागृतीच्या नावाखाली सोशल मीडियावर तिच्या मृत्यूबाबत 'पब्लिसिटी स्टंट' केला. 'ईटीव्ही भारत'नं या घटनेवर फॅक्ट चेकिंग तज्ञ मुरलीकृष्णन चिन्नादुराई यांच्याशी खास चर्चा केली.
प्रश्न : सोशल मीडियावर मृत्यू झाल्याचं नाटक करणाऱ्या पूनम पांडेला तुम्ही फॅक्ट चेकरच्या दृष्टीकोनातून कसं पाहता?
उत्तर : प्रथम, ही बातमी तिच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर होती. याबाबत इतरत्र कुठेही माहिती उपलब्ध नव्हती. इंस्टाग्राम पेजच्या दाव्याची पुष्टी करण्यासाठी कोणतेही वैद्यकीय पुरावे उपलब्ध नव्हते. तथापि, अधिकृत अकाऊंटवरची पोस्ट असल्यामुळे, विविध माध्यमांनी ही बातमी दिली. संशयाला जागा असली, तरी कागदपत्रं आणि पुराव्याच्या आधारे वस्तुस्थिती तपासता येते. मात्र असं करणं आव्हानं होतं, कारण वैद्यकीय अहवालात तिच्या 'मृत्यू'ची पुष्टी झाली होती मात्र तिच्या मृतदेहाचा ठावठिकाणा नव्हता.
प्रश्न : ही खोटी बातमी उघड करायला उशीर का झाला?
उत्तर : पूनम पांडेच्या मृत्यूचा दावा करणारी एक इंस्टाग्राम पोस्ट 2 फेब्रुवारीच्या सकाळी अभिनेत्रीच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करण्यात आली होती. मात्र यासंदर्भात तिच्या नातेवाईकांशी त्वरित संपर्क होऊ शकला नाही. तिचा मित्र मुनाव्वर फारुकी यानंही त्याच्या अधिकृत पेजवर पोस्ट केलं की, ही बातमी ऐकून तो हैराण झाला आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत कोणताही पुरावा उपलब्ध नसल्यामुळे, फॅक्ट चेकर तज्ञांच्या राष्ट्रीय पॅनेलनं बातमीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. माहितीची पडताळणी करण्यासाठी मुंबईस्थित एका फॅक्ट चेकरनं पूनम पांडेच्या जवळच्या लोकांशी संपर्क साधला. यानंतर मृत्यूची बातमी खरी नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. मात्र हे अधिकृतपणे फसवणूक असल्याचं नाकारता येत नाही, कारण त्यासाठी पुरेसे पुरावे नव्हते. या प्रकारच्या फेक न्यूजला पोस्ट ट्रूथ म्हणता येईल. याचा अर्थ संबंधित व्यक्ती किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी ते नाकारल्याशिवाय ते खोटे म्हणून स्थापित करणं कठीण आहे.
प्रश्न : पूनम पांडेनं दावा केला की तिनं 'सर्वायकल कॅन्सर' विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी मृत्यूची खोटी कथा तयार केली होती. हे सकारात्मकरित्या का घेतलं जाऊ शकत नाही?
उत्तर : हे सकारात्मक मानलं जाऊ शकत नाही. हेतू काहीही असो, मात्र हा मार्ग मुळातच सदोष आहे. याचं कारण असं की मृत्यूच्या प्रचारामुळे या प्रकारच्या कर्करोगानं ग्रस्त असलेल्या आणि त्यातून बरे होत असलेल्यांच्या आशांना धक्का बसतो. पीडित आणि त्यांच्या जवळच्या लोकांसाठी या मानसिक युद्धाच्या परिणामातून सावरणं इतके सोपं नाही. जनजागृती हेच ध्येय असेल, तर या प्रकारच्या मोहिमेचा अवलंब करण्याऐवजी प्रामाणिक मार्ग निवडणं हाच त्यावर उपाय ठरेल.