नवी दिल्ली Election Commissioner Arun Goel resigns : निवडणक आयुक्त अरुण गोयल यांनी दिलेला हा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केलाय. अरुण गोयल यांनी राजीनामा दिल्यानंतर आता मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडेच पदभार राहणार आहे. निवडणूक आयोगात मुख्य निवडणूक आयुक्ताशिवाय इतर दोन आयुक्त असतात.
राष्ट्रपतींनी मंजूर केला राजीनामा : लोकसभा निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहेत. निवडणूक व्यवस्थित पार पडावी यासाठी पूर्ण जबाबदारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या खांद्यावर आहे. निवडणूक तयारीची पाहणीसाठी अरुण गोयल यांनी राजीव कुमार यांच्यासह काही राज्यांचा दौरा केला होता. आता अचानक त्यांनी राजीनामा दिलाय. राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
आयोगातील दोन पदं रिक्त : अरुण गोयल यांचा कार्यकाळ २०२७ साली संपणार होता, त्याआधीच फक्त १५ महिने पदावर राहिल्यानंतर गोयल यांनी अचानक राजीनामा दिलाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू् यांनी त्यांचा राजीनामा स्विकारलाय. निवडणूक आयोगात आधीपासून एक आयुक्तपद रिक्त आहे. त्यानंतर आयोगात मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि गोयल हेच राहिले होते. आता गोयल यांच्या राजीनाम्याने आयोगामध्ये फक्त राजीव कुमार आहेत.
गोयल यांची नियुक्ती सापडली होती वादात :अरूण गोयल हे 1985 च्या बॅचचे आयएस अधिकारी आहेत. (दि. 18 नोव्हेंबर 2022) ला त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. त्यानंतर लगेचच म्हणजेच (दि.19 नोव्हेंबर 2022) ला निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. त्यांची नियुक्ती वादात अडकली होती. या नियुक्तीला सर्वोच्च न्यायालयात आव्हानही देण्यात आलं होतं. अरूण गोयल यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे, तर मग त्यांना इतक्या तातडीने निवडणूक आयुक्तपद का दिलं गेलं? असं सर्वोच्च न्यायालयाने सरकारला विचारलं होतं.