नवी दिल्ली ED arrested CM Kejriwal : कथित मद्य दारु घोटाळ्यात सुमारे दोन तासांच्या चौकशीनंतर ईडीनं गुरुवारी रात्री मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केलीय. प्राप्त माहितीनुसार ईडीच्या 12 अधिकाऱ्यांच्या टीम गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता केजरीवाल यांच्या अधिकृत निवासस्थानी पोहोचली होती. त्यांनी शोधमोहीम राबवल्यानंतर पथकानं त्याची चौकशी करुन रात्री नऊ वाजण्यास सुमारास केजरीवाल यांना अटक केली. तत्पूर्वी, दिल्ली उच्च न्यायालयानं दुपारी चार वाजता मुख्यमंत्र्यांना अटकेपासून देणारी याचिका फेटाळली होती.
आज करणार न्यायालयात हजर : मिळालेल्या माहितीनुसार, अटकेनंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना ईडीच्या मुख्यालयात नेण्यात आलंय. तिथं त्यांची चौकशी करुन आज त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे. सीबीआय आणि ईडीकडून मद्य घोटाळ्याची सुमारे दीड वर्षांपासून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात नाव असलेल्या लोकांची केंद्रीय तपास यंत्रणाकडून चौकशी करत आहे. याप्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये आपचे खासदार संजय सिंह यांनाही अटक करण्यात आली होती.
ईडीच्या समन्सकडे दुर्लक्ष : नोव्हेंबरपासून ईडी या प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी सतत समन्स पाठवत आहे. आतापर्यंत 9 समन्स पाठवण्यात आले होते. परंतु त्यांनी समन्सकडे दुर्लक्ष करुन केजरीवाल यांनी न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयातही सुनावणी झाली. न्यायालयानं ईडीच्या बाजूनं निर्देश दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 एप्रिल रोजी होणार आहे.