नवी दिल्ली Rajendra Nagar Waterlogging :दिल्लीत पावसाने धुमाकूळ केला आहे. आयएएसच्या कोचिंग क्लासेससाठी प्रसिद्ध असलेल्या जुन्या राजेंद्र नगर येथील 'राऊस आयएएस स्टडी सेंटर'च्या तळघरात पाणी भरले. या पाण्यात बुडून तीन जणांचा मृत्यू झाला. सध्या एनडीआरएफच्या पथकाकडून बचाव कार्य सुरू आहे. दिल्ली सरकारनं या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
दिल्ली पोलिसचे सेंट्रल डिस्ट्रिक्ट डीसीपी एम. हर्षवर्धन यांनी सांगितलं की, "आम्हाला संध्याकाळी 7 वाजता एका स्टडी सेंटरच्या तळघरात पाणी भरल्याची माहिती मिळाली. फोन करणाऱ्यानं सांगितलं की, तिथे काही लोक अडकले असण्याची शक्यता आहे. संपूर्ण तळघर पाण्यानं कसं भरलं? याचा तपास करत आहोत."
शिक्षण मंत्री आतिशी यांची प्रतिक्रिया :स्टडी सेंटरमध्ये पाणी भरल्यानंतर झालेल्या दुर्घटनेवर दिल्लीच्या शिक्षण मंत्री आतिशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आतिशी म्हणाल्या की, "अग्निशमन दल आणि एनडीआरएफचं पथक घटनास्थळी आहे. दिल्लीचे महापौर आणि स्थानिक आमदार घटनास्थळी उपस्थित आहेत. मुख्य सचिव नरेश कुमार यांना या घटनेची चौकशी सुरू करून 24 तासांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. माझंही घटनास्थळावर लक्ष आहे. या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली जाईल. त्यांना माफ केलं जाणार नाही."