नवी दिल्ली-राजधानी आणि एनसीआरमध्ये आज पहाटे ५.३७ च्या सुमारास भूकंप झाला. भूकंपाचे धक्के मध्यम स्वरुपाचे होते. भूकंपानं इमारती हादरू लागल्यानंतर अनेक लोक घराबाहेर पडले.
राष्ट्रीय भूकंप केंद्राच्या माहितीनुसार भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.० इतकी नोंद झाली. भूकंपाचे केंद्र नवी दिल्लीत जमिनीखाली पाच किलोमीटर खोलीवर होते. हे केंद्र २८.५९ अंश उत्तर अक्षांश आणि ७७.१६ अंश पूर्व रेखांशावर होते.
नागरिकांनी कसा अनुभवला भूकंप-भूकंपामुळे अचानक सर्व काही हादरायला लागले. त्यामुळे ग्राहक ओरडू लागले, असे नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील विक्रेता अनिश यांनी सांगितलं. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर रेल्वेची प्रतिक्षा करणाऱ्या प्रवाशांमध्ये भूकंपानंतर भीतीचे वातावरण निर्माण झालं. एका प्रवाशानं सांगितलं, जणू काही रेल्वे जमिनीखाली धावत आहे असे वाटलं. सगळं काही हादरत होतं. वेटिंग लाउंजमध्ये थांबलेले सगळे प्रवासी भूकंप होताच बाहेर पडले. त्यावेळी पूल किंवा काहीतरी कोसळल्यासारखा प्रवाशांना भास झाला. दुसऱ्या प्रवाशाच्या माहितीनुसार भूकंप थोड्या काळासाठी होता. पण त्याची तीव्रता खूप जास्त होती. अचानक झालेल्या भूकंपामुळे झाडांवर बसलेले पक्षीही भेदरून किलबिलाट करत झाडावरून उडताना दिसून आले.
दिल्ली-एनसीआर आहे भूकंपप्रवण प्रदेश-दिल्ली, नोएडा, इंदिरापुरम आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्राच्या (एनसीआर) इतर भागांना भूकंपाचे मोठे धक्के बसले आहेत. भूकंपाचे धक्के काही सेकंदांचे असले तरी अनेकांनी खबरदारीचा उपाय म्हणून घराबाहेर पडणं पसंत केले. भूकंपामुळे कोणेतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही. दिल्ली-एनसीआर भूकंपीय झोन IV मध्ये येतो. त्यामुळे हा भूकंपप्रवण भाग म्हणून ओळखला जातो. या भागात मध्यम ते तीव्र स्वरुपाचे भूकंप होतात. प्रशासनाकडून रहिवाशांना अशा घटनांदरम्यान सतर्क राहण्याचं आणि सुरक्षा नियमांचे पालन करण्याचं नेहमीच आवाहन केलं जातं.
सतर्क राहण्याचं आवाहन-गाझियाबादमधील एका रहिवाशाच्या माहितीनुसार भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, संपूर्ण इमारत हादरत होती. एवढा भूकंप कधीही अनुभवला नाही, असे रहिवाशानं सांगितलं. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांनीदेखील सर्वांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स मीडियात पोस्ट करत म्हटले, "दिल्ली आणि जवळपासच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले. सर्वांना शांत राहण्याचं आणि सुरक्षिततेचे उपाय करण्याचं आवाहन आहे. संभाव्य भूकंपानंतरच्या धक्क्यांसाठी सतर्क राहण्याचे आवाहन आहे. अधिकारी परिस्थितीवर काळजीपूर्वक लक्ष ठेवून आहेत."
हेही वाचा-
- नेपाळमध्ये 7.1 रिश्टर स्केलच्या भूकंपानं 32 जणांचा बळी; बिहारसह दिल्लीत बसले धक्के
- कोयना धरण परिसर भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला, नव्या वर्षातील पहिल्या भूकंपाची झाली नोंद