नवी दिल्ली Rules Changes From 1 June 2024 : जून महिना सुरू होताच अनेक प्रकारचे नियम बदलणार आहेत. नियमांमधील बदलांचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचं मतदानही १ जून रोजी संपत आहे. अशा परिस्थितीत कोणते नियम बदलणार आहेत हे जाणून घेणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी संपूर्ण बातमी वाचा....
ड्रायव्हिंग लायसन्स : जर तुम्ही दिल्ली एनसीआरमध्ये राहत असाल, तर तुमच्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सशी संबंधित नियमांबद्दल अपडेट राहणे खूप महत्त्वाचं आहे. नवीन वाहतुकीचे नियम 1 जूनपासून लागू होणार आहेत. १ जूनपासून नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी 'आरटीओ'मध्ये चाचणी देणं बंधनकारक असणार नाही. सरकारनं मान्यता दिलेल्या कोणत्याही खासगी संस्थेत तुम्ही ड्रायव्हिंग टेस्ट देऊ शकता. 'आरटीओ'ला वारंवार भेट देण्याची गरज आता संपुष्टात येणार आहे.
वाहतूक नियम :रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमात बदल केले जात आहेत. अल्पवयीन मुलांनी वाहन चालवल्यानं रस्त्यावर अपघात वारंवार घडत आहेत. नवीन वाहतूक नियमांनुसार 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीनं वाहन चालवल्यास 25 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. तसंच संबंधित व्यक्ती 25 वर्षांची होईपर्यंत नवीन परवाना जारी केला जाणार नाही. अशा परिस्थितीत जर तुमच्या घरात दुचाकी किंवा चारचाकी वाहन असेल तर अल्पवयीन व्यक्तीला वाहन चालवण्यापासून तुम्ही दूर ठेवायलं हवं.