नवी दिल्ली Samvidhaan Hatya Diwas : केंद्रातील मोदी सरकारनं 25 जून हा दिवस 'संविधान हत्या दिन' म्हणून घोषित केला आहे. केंद्र सरकारनं याबाबत अधिसूचना जारी केली आहे. 25 जून 1975 रोजी तत्कालीन इंदिरा गांधी सरकारनं देशात आणीबाणी जाहीर केली होती. ते पाहता मोदी सरकारनं काँग्रेसला कोंडीत पकडत हा दिवस 'संविधान हत्या दिन' म्हणून घोषित केला आहे.
गृहमंत्री अमित शाहांची घोषणा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडियावरुन ही माहिती दिली. त्यांनी यासंदर्भात एक पोस्ट करत लिहिलं की, "25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादून, हुकूमशाही मानसिकतेचं प्रदर्शन करुन आपल्या लोकशाहीच्या आत्म्याचा गळा घोटला. लाखो लोकांना कोणतीही चूक नसताना तुरुंगात टाकण्यात आलं आणि प्रसारमाध्यमांचा आवाजही कमी झाला. 1975 च्या अमानुष वेदना सहन करणाऱ्या सर्वांच्या महान योगदानाचं स्मरण करण्यासाठी भारत सरकारनं दरवर्षी 25 जून हा दिवस 'संविधान हत्या दिन' म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं घेतलेल्या या निर्णयामागे लाखो लोकांच्या लढ्याचा सन्मान करणं हा हेतू आहे, ज्यांनी हुकूमशाही सरकारच्या असंख्य यातना आणि दडपशाहीचा सामना करुनही पुढं आलं आहे. 'संविधान हत्या दिन' साठी संघर्ष केला गेला आहे."