रामनगर (उत्तराखंड):उत्तराखंडमध्ये सातत्यानं अपघात होत आहेत. आज उत्तराखंडमधील अल्मोडा येथे भीषण रस्ते अपघात झालाय. अल्मोडामधील मार्चुला येथील कुपी गावाजवळ बसचं नियंत्रण सुटून बस खोल दरीत कोसळली. अपघाताच्या वेळी बसमध्ये 50 हून अधिक प्रवासी होते. अपघातात 36 जणांचा मृत्यू झाला आहे.
उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यात प्रवासी बस सुमारे 100 मीटर खोल दरीत कोसळली आहे. अल्मोडा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी या अपघातात आतापर्यंत 36 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिलीय. गोळीखल भागातील प्रवाशांना घेऊन ही बस रामनगरला जात होती, अशी माहिती देण्यात आलीय. अपघातग्रस्त बस जीएमओयू म्हणजेच गढवाल मोटर्स ओनर्स युनियन लिमिटेडची आहे.
अपघातस्थळी मदतकार्य सुरू :उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केलाय. अपघातातील गंभीर जखमींना एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचनाही दिल्यात. अल्मोडा जिल्ह्यातील सॉल्टच्या मार्चुला येथील कुपी गावाजवळ गढवाल मोटर ओनर्स युनियन लिमिटेडची बस खोल दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोक आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू केलंय. मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या सणाकरिता अनेक जण त्यांच्या मूळ गावी आले होते. त्यामुळं डोंगरावरील टॅक्सी आणि बसमध्ये प्रवाशांची गर्दी होती. त्यादरम्यान हा भीषण अपघात झाला.