रांची : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज (3 नोव्हेंबर) झारखंड निवडणुकीसाठी भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त पक्षानं 150 संकल्प जारी केले आहेत. संकल्प पत्रात 'गोगो दीदी योजनें'तर्गत महिलांना दरमहा 2100 रुपये, 300 युनिट मोफत वीज, 500 रुपयांमध्ये गॅस सिलेंडर, युवा साथी योजनेंतर्गत पदवीधर आणि पदव्युत्तर बेरोजगार तरुणांना दोन वर्षांसाठी 2 हजार रुपये प्रति महिना भत्ता देण्याचं आश्वासन देण्यात आलंय.
काय म्हणाले अमित शाह? : संकल्प पत्र जारी करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, "आम्ही इतर पक्षांप्रमाणे घोषणा करत नाही, तर संकल्प करतो. त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करतो. केंद्रात आणि राज्यातील आमच्या सरकारचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. आमचा पक्ष जे बोलतो तेच करुन दाखवतो. झारखंडमधील 'माटी, बेटी आणि रोटी' वाचवण्याचा संकल्प घेऊन आम्ही निवडणुकीत उतरलोय." पुढं हेमंत सोरेन यांच्यावर टीका करत शाह म्हणाले की, "ते पूर्णपणे भ्रष्टाचारात बुडाले आहेत. केंद्र सरकारनं राज्याला साडेचार लाख कोटी रुपयांहून अधिक निधी दिला. पण ही रक्कम वापरण्याऐवजी हेमंत सोरेन यांचं सरकार लुबाडण्यात व्यस्त राहिलं. भाजपा देशात समान नागरी संहिता आणेल. मात्र, आदिवासी समाजाला त्यातून बाहेर ठेवले जाईल."
संकल्प पत्रात केलेल्या प्रमुख घोषणा :
- सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या वर्षी दीड लाख सरकारी पदांवर नियुक्त्या करण्यात येणार आहे. पाच वर्षांत 2 लाख 87 हजार 500 पदांवर नियुक्त्या होणार आहेत.
- पाच वर्षांत पाच लाख तरुणांना रोजगार निर्माण होणार
- पेपरफुटी रोखण्यासाठी कडक कायदा आणणार
- महिलांच्या नावावर 50 लाख रुपयांपर्यंतच्या मालमत्तेची केवळ एक रुपयात नोंदणी
- अग्निशमन दलात सरकारी नोकरीची हमी
- प्रत्येक गरीबाला पाच वर्षांत कायमस्वरूपी घर मिळेल.
- सर्व कुटुंबांना 500 रुपयांत गॅस सिलेंडर मिळणार.
- दिवाळी आणि रक्षाबंधनाला दोनदा मोफत सिलेंडर
- गोगो दीदी योजनेंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याच्या 11 तारखेला 2100 रुपये दिले जातील.
- 3100 रुपये प्रतिक्विंटल दरानं धान्याची खरेदी करण्यात येणार असून 48 तासांत पेमेंट करण्यात येणार आहे.
- प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेंतर्गत राज्यात 25 हजार किमीचे रस्ते बांधण्यात येणार.
- आदी घोषणा या संकल्प पत्रात करण्यात आल्या आहेत. यावेळी कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, भाजपा प्रदेशाध्यक्ष बाबुलाल मरांडी, कार्याध्यक्ष रवींद्र कुमार राय, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, माजी केंद्रीय मंत्री अर्जुन डॉ. मुंडा आदींसह अनेक नेते उपस्थित होते.
हेही वाचा -
- स्नेहलता कोल्हेंची नाराजी दूर करण्यासाठी चक्क अमित शाह यांची मध्यस्थी; पारंपरिक विरोधक काळे कोल्हे एकत्र येणार का?
- "एका पक्षाच्या बळावर सरकार येऊच शकत नाही", अमित शाह यांच्या वक्तव्यावर अजित पवारांचं प्रत्युत्तर - Ajit Pawar On Amit Shah
- "महाराष्ट्रातील भाजपाचे कार्यकर्ते निराशेत"; खुद्द अमित शाहांचीच कबुली, म्हणाले, स्वबळावर... - BJP Mumbai meeting