नवी दिल्ली :Bihar Politics LIVE : बिहार राजकारणात कधीही राजकीय भूकंप होईल अशी स्थिती आहे. नितीश कुमार आजच भाजपासोबत जाऊन पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अशी सूत्रांची माहिती आहे. बिहारमध्ये सध्या वेगाने घडणाऱ्या राजकीय घडामोडींबाबत भाजपा नेतृत्वानं राज्यातील प्रमुख नेत्यांना दिल्लीत बोलावून त्यांच्याशी चर्चा केल्याचीही खात्रीलायक माहिती आहे. गुरुवार रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बिहारमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी आणि राज्यातील इतर नेत्यांशी सध्याच्या घडामोडी आणि भविष्यातील परिस्थितीवर चर्चा केली आहे. या बैठकीत बिहार भाजपचे प्रभारी सरचिटणीस विनोद तावडे आणि प्रदेश संघटन मंत्री नागेंद्रनाथ त्रिपाठीही उपस्थित होते.
दार कोणासाठीही कायमचं बंद नसतं : बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी एक्स मीडियावर पोस्ट केलंय. त्यामध्ये मांझी म्हणाले ''बंगालीमध्ये म्हणतात, ''खेल होबे'', मगहीमध्ये म्हणतात, ''खेला होक्टो'' भोजपुरीमध्ये म्हणतात, ''खेला होखी''. बाकी तुम्ही स्वतः शहाणे आहात…'' असं म्हणत मांझी यांनी नितीश कुमार पुन्हा भाजपामध्ये जाणार असल्याचे संकते दिले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये जुनाच फॉर्म्युला लागू होऊ शकतो. नितीशकुमार हे भाजपच्या कोट्यातून मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनीही दार कोणासाठीही कायमचं बंद नसतं असं म्हटलं आहे. लोजप (रामविलास) सुप्रीमो चिराग पासवान हे देखील बिहारमधील राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी रात्री उशिरा पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती आहे.
सातव्यांदा घेतली होती शपथ :यापूर्वी नितीश कुमार यांनी भाजपावर कट रचल्याचा आरोप केला होता. बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांची भेट घेतली. त्यानंतर नितीश कुमार यांनी 164 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र देत स्वत: मुख्यमंत्री पदाची आणि उपमुख्यमंत्री म्हणून आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी शपथ घेतली.
नितीश कुमारांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ
- नितीश कुमार सर्वप्रथम 3 मार्च 2000 साली आठ दिवसांसाठी मुख्यमंत्री बनले होते. परंतु, बहुमताची जमवाजमव करता न आल्यानं त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.
- दुसऱ्यांदा नितीश कुमारांनी 24 नोव्हेंबर 2005 रोजी बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
- तिसऱ्यांदा 26 नोव्हेंबर 2010 रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
- चौथ्यांदा नितीश कुमार यांनी 22 फेब्रुवारी 2015 साली मुख्यमंत्री पद मिळवले.
- पाचव्यांदा पुन्हा 20 नोव्हेंबर 2015 साली नितीश कुमारांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
- सहाव्या वेळी आरजेडी सोबत आघाडी तुटल्यानंतर एनडीएच्या नेतृत्वात नितीश कुमार यांनी पुन्हा 27 जुलै 2017 रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
- नितीश कुमार यांनी 10 ऑगस्ट 2022 रोजी आरजेडीसोबत जात सातव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.