नवी दिल्ली Foreign Delegates In India : लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी 10 देशांतील 18 राजकीय पक्षांचे नेते भारतात पोहोचलेत. मात्र, असं असतानाच परदेशी नेत्यांच्या शिष्टमंडळात बांगलादेशच्या अवामी लीगला (Bangladesh Awami League) आमंत्रित करण्याचं राजकीय महत्त्व काय?, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
भाजपाच्या निमंत्रणावरुन बांगलादेशातील सत्ताधारी अवामी लीग पक्षानं भारतात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकांचं निरीक्षण करण्यासाठी आपला प्रतिनिधी पाठवण्याचा निर्णय घेतलाय. मीडिया रिपोर्टनुसार, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी संसद सदस्य आणि अवामी लीगचे माहिती आणि संशोधन सचिव सलीम महमूद यांची लोकसभा निवडणुका पाहण्यासाठी 1 ते 5 मे दरम्यान भारत दौऱ्यावर येण्यासाठी निवड केली. या दौऱ्यात ते भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. राज्यातील भाजपाचा निवडणूक प्रचार पाहण्यासाठी त्यांना छत्तीसगडलाही नेण्यात येणार आहे. बांगलादेश हा 10 देशांपैकी एक आहे जिथून भाजपानं राजकीय पक्षांना सत्ताधारी भारतीय पक्षाच्या निवडणूक मोहिमेचं तसंच एकूण निवडणूक प्रक्रियेचं निरीक्षण करण्यासाठी आमंत्रित केलंय. 10 देशांतील 18 पक्षांच्या प्रतिनिधींनी बुधवारी भाजपाचे प्रमुख जे पी नड्डा आणि परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांची पक्षाच्या मुख्यालयात भेट घेतली. यासंदर्भातील माहिती जे. पी. नड्डा यांनी एक्सवरुन दिली.
भाजपानं कोणकोणत्या राजकीय पक्षांना केलं आमंत्रित :भाजपाच्या परराष्ट्र विभागाचे प्रभारी विजय चौथाईवाले यांनी बुधवारी जारी केलेल्या निवेदनानुसार, 10 देशांतील 18 राजकीय पक्षांचे प्रतिनिधी भाजपाच्या निवडणूक प्रचाराचा प्रत्यक्ष अनुभव आणि माहिती घेण्यासाठी भारतात आलेत. बांगलादेशच्या अवामी लीग व्यतिरिक्त आमंत्रित इतर देशांतील इतर पक्षांमध्ये ऑस्ट्रेलियातील लिबरल पार्टी, व्हिएतनामची कम्युनिस्ट पार्टी, इस्रायलची लिकुड पार्टी, युगांडाची नॅशनल रेझिस्टन्स मूव्हमेंट, टांझानियाची चामा चा मापिंडुझी, रशियाची युनायटेड रशिया पार्टी, श्रीलंकेची युनायटेड रशियन पार्टी, लंका पोदुजाना पेरामुना आणि युनायटेड नॅशनल पार्टी, नेपाळमधून नेपाळी काँग्रेस, जनमत पार्टी, नेपाळची कम्युनिस्ट पार्टी (युनिफाइड मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट), कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (माओवादी) आणि राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी याशिवाय मॉरिशसमधील लढाऊ समाजवादी चळवळ, मॉरिशस लेबर पार्टी, यांचा यामध्ये समावेश आहे.
अवामी लीगचं निमंत्रण महत्त्वाचं का :बांगलादेशमधील शैक्षणिक आणि सामाजिक कार्यकर्त्या, सध्या भारतातील KREA विद्यापीठात पोस्ट-डॉक्टरेट फेलोशिप घेत असलेल्या शरीन शाहजहान नाओमी यांनी ईटीव्ही भारतला सांगितलं की, भारताला बांगलादेशची आंतरराष्ट्रीय प्रतिमा चांगली असावी असं वाटतंय. या वर्षी जानेवारीत पार पडलेल्या बांगलादेशच्या संसदीय निवडणुकीत अवामी लीग पुन्हा सत्तेवर निवडून आली. त्या निवडणुकांपूर्वी, मुख्य विरोधी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) आणि इस्लामवादी शक्तींसह त्याच्या मित्रपक्षांनी अंतरिम सरकार स्थापन करण्याची मागणी केली होती. मात्र, शेख हसीना यांनी ही मागणी फेटाळून लावली. यानंतर अनेक विरोधी पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. बांगलादेशातील निवडणुकीपूर्वी अमेरिका आणि इतर पाश्चात्य शक्तींनीही निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बांगलादेशातील निवडणुका ही त्या देशाची अंतर्गत बाब असल्याचं सांगत भारतानं तटस्थ भूमिका घेतली.
शेख हसीना भारतात कधी येणार :सत्तेत परतल्यानंतर शेख हसीना भारताचे द्विपक्षीय यजमानपद भूषवणार आहेत. भारत देखील त्यांच्या यजमानपदासाठी इच्छुक असून परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा हे देखील लवकरच यासंदर्भात ढाका येथे जाणार आहेत. तर नाओमींच्या मते, भारताला बांगलादेशला आपला मित्र आणि भागीदार बनवायचंय. ही वृत्ती व्यापार संबंध, शिक्षण, मीडिया, वैज्ञानिक आणि तांत्रिक सहकार्यामध्ये दिसून येईल. तसंच गेल्या आठ वर्षांत अवामी लीग बांगलादेशातील सर्वात मोठा धर्मनिरपेक्ष पक्ष ठरलाय.