अलवर /राजस्थान :Rape of patient admitted in ICU : राजस्थानमधील अलवरमध्ये रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल असलेल्या महिला रुग्णावर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या हरीश हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल असलेल्या 24 वर्षीय महिलेवर हॉस्पिटलच्या नर्सिंग स्टाफनेच बलात्कार केला होता. चिराग यादव असं आरोपी कामगाराचं नाव आहे. रुग्णालयात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्येही आरोपी महिलेच्याजवळ जाताना दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
आयसीयूमध्ये उपचार सुरू : रात्री 3.30 च्या सुमारास वॉर्ड बॉय हा आयसीयूमध्ये आला. त्यानं अश्लील कृत्य करत असल्याचा आरोप पीडितेनं केला आहे. याला तिनं विरोध केला. त्यानंतर त्यानेच महिलेला नशेचे इंजेक्शन देऊन बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी वॉर्ड बॉय चिराग यादव हा तिजारा पोलीस ठाण्याच्या ढकीबांधडा येथील रहिवासी आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे पीडितेला सोमवारी दुपारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.
रुग्णालय व्यवस्थापनावर धमकावल्याचा आरोप : या घटनेची तक्रार केल्यानंतर पीडित महिलेनं रुग्णालयातील कर्मचारी आणि व्यवस्थापनावर धमकावल्याचा आरोपही केला आहे. रुग्णालय संचालक लवेश गुप्ता यांनी सांगितलं की, रुग्णालयात घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. रुग्णालय प्रशासनानंच आरोपी कर्मचाऱ्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं. रुग्णालय प्रशासन पोलिसांना पूर्ण सहकार्य करत आहे.
आरोपींची चौकशी सुरू : शिवाजी पार्क पोलीस स्टेशनचे प्रभारी राजपाल सिंह यांनी सांगितलं की, "बडोदा मेओ पोलीस स्टेशन परिसरातील एका महिलेला हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. रात्री उशिरा रुग्णालयात वॉर्ड बॉयनं बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची पोलीस कसून चौकशी करत आहेत.