लखनऊ Men Are Not Always At Fault :लग्नाच्या आमिषानं तरुणानं बलात्कार करुन लैंगिक शोषण केल्याचा आरोप एका तरुणीनं केला होता. त्यामुळे पीडितेच्या आरोपावरुन तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ट्रायल कोर्टानं तरुणाला दोषमुक्त केल्यानं पीडितेनं अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र ट्रायल कोर्टाचा निर्णय कायम ठेवत अलाहाबाद न्यायालयानंही या तरुणाला दोषमुक्त केलं. "महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे कायदे हे महिला केंद्रीत आहेत. त्यामुळे लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात नेहमी पुरुषचं दोषी असेल, असं नाही. या परिस्थितीत पुरावे सादर करण्याची जबाबदारी दोघांची असते," अशा कडक शब्दात अलाहाबाद उच्च न्यायालयानं आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. न्यायमूर्ती राहुल चतुर्वेदी आणि न्यायमूर्ती नंदप्रभा शुक्ला यांच्या खंडपीठानं आरोपीच्या निर्दोष मुक्ततेच्या आदेशाविरुद्ध पीडितेचं अपील फेटाळताना हा निर्णय दिला.
शारीरिक संबंध खोट्या आमिषानं झाल्याचं कोणतंही सूत्र नाही :या प्रकरणात तरुणीनं आपल्याला आरोपी तरुणानं लग्नाचं खोटं आमिष दाखवून आपल्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप केला. त्यावर निर्णय देताना अलाहाबाद उच्च न्यायालयानं आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं. "पीडितेसोबत शारीरिक संबंध खोट्य़ा आश्वासनांवर आधारित असावे की दोघांच्या संमतीनं, याचं असं कोणतंही थेट सूत्र नाही. प्रत्येक प्रकरणातील तथ्यांचं विश्लेषण करुनचं हे ठरवता येईल." न्यायमूर्ती राहुल चतुर्वेदी आणि न्यायमूर्ती नंदप्रभा शुक्ला यांच्या खंडपीठानं पीडितेचं अपील फेटाळून लावलं. तसेच लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातून आरोपीच्या निर्दोष मुक्ततेचा आदेश दिला.
काय आहे प्रकरण :कर्नलगंज इथली पीडित तरुणी 2019 मध्ये एका तरुणावर लग्नाचे खोटे आश्वासन देऊन बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. ही तरुणी मागासवर्गीय असल्यानं या प्रकरणात अॅट्रॉसीटी कायद्याच्या विविध कलमानुसारही गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे मागासवर्गीय कायद्याच्या विशेष न्यायालयानं 8 फेब्रुवारी 2024 ला या बलात्कार आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता केली. केवळ प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात त्याला दोषी ठरवून 6 महिन्याची शिक्षा ठोठावली. त्याला एक हजार रुपये दंडही ठोठावला.