धनबाद SC order to IIT ISM Dhanbad : दिलेल्या मुदतीत शुल्क न भरू शकल्यामुळं एका विद्यार्थ्याला आयआयटी धनबादमध्ये प्रवेश घेता आला नव्हता. मात्र, या प्रकरणावरुन आयआयटी प्रशासनावर नाराजी व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयानं सोमवारी (30 सप्टेंबर) एक महत्त्वाचा निकाल दिला. याप्रकरणी सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं आयआयटी धनबदाला निर्देश दिले आहेत की, सदरील विद्यार्थ्याला आयआयटीत प्रवेश द्यावा.
नेमकं काय आहे प्रकरण? :उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात राहणारा अतुल कुमार जेईई परीक्षा उत्तीर्ण झाला होता. त्याला आयआयटी धनबादमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग विभागातील जागा मिळाली होती. 24 जून 2024 पर्यंत त्याला शुल्क भरावं लागणार होतं. परंतु, तो वेळेत पैशांची जमवाजमव करून शुल्क भरू शकला नाही. त्यामुळं त्याची सीट रद्द केली गेली. त्यानंतर अतुलनं झारखंड उच्च न्यायालय आणि मद्रास उच्च न्यायालयाचं दार ठोठावलं. तिथं त्याला न्याय मिळाला नाही. अखेर अतुलनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सोमवारी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं आयआयटीवर नाराजी व्यक्त केली. तसंच अतुलला आयआयटीत प्रवेश देण्यात यावा, असे निर्देश दिले.