नवी दिल्ली Atishi Delhi New CM :आम आदमी पक्षाच्या महिला नेत्या आणि सरकारमधील बहुतांश विभागांची जबाबदारी सांभाळणाऱ्या आतिशी यांनी शनिवारी (21 सप्टेंबर) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांनी आतिशी यांना राज निवास येथे पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. याशिवाय पाच आमदार गोपाल राय, कैलाश गेहलोत, सौरभ भारद्वाज, इम्रान हुसेन आणि मुकेश अहलावत यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळा साध्या पद्धतीनं पार पडला.
पाच आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ : दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांचा शपथविधी स्वीकारण्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली. तसेच अरविंद केजरीवाल यांचा राजीनामाही स्वीकारला आहे. राष्ट्रपतींनी मंजूर केलेले पाच आमदार गोपाल राय, कैलाश गेहलोत, सौरभ भारद्वाज, इम्रान हुसेन आणि मुकेश अहलावत यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळा साध्या पद्धतीने पार पडला. त्यात फक्त दिल्ली सरकारचे सचिव दर्जाचे अधिकारी सहभागी झाले होते.
आतिशी यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ (ANI) दीड वर्षात मंत्रिपदावरून मुख्यमंत्री बनल्या आतिशी :दिल्ली दारू घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन अटकेत होते. त्यांच्या जागी आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांचा समावेश मंत्रिमंडळात करण्यात आला होता. आतिशी या मार्च २०२३ मध्ये मंत्री बनल्या होत्या. आता दीड वर्षात मंत्रिपदावरून त्या मुख्यमंत्री बनल्या आहेत.
'आप' कार्यकर्त्यांना आवाहन :अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचं दुःख आहे. त्यामुळं मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अभिनंदन, जल्लोष न करण्याचं आवाहन आतिशी यांनी कार्यकर्त्यांना केलं होतं. त्यानुसार आतिशी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर 'आप'च्या कार्यकर्त्यांनी कोणताही जल्लोष आणि आनंद साजरा केला नाही. शपथविधी सोहळा देखील अगदी साध्या पद्धतीनं पार पडला.
आतिशी या अरविंद केजरीवाल यांच्या उत्तराधिकारी : अरविंद केजरीवाल यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. त्यानंतर 17 सप्टेंबरला झालेल्या आमदारांच्या बैठकीत मंत्री आतिशी मार्लेना यांच्या नावावर शिक्कामोर्जब करण्यात आला. त्यामुळं दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची माळ आतिशी यांच्या गळ्यात पडणार असल्याचं निश्चित झालं होतं. दिल्ली दारू घोटाळ्यात अरविंद केजरीवाल हे कारागृहात असताना मंत्री आतिशी यांनी खंभीरपणे सरकारची बाजू लावून धरली होती. त्यांनी सरकारचं कामकाजही चांगल्या पद्धतीनं हाताळलं होतं. त्यासह आतिशी यांनी वेळोवेळी आम आदमी पार्टीची बाजू लावून धरत अरविंद केजरीवाल यांना जोरदार पाठिंबा दिला. 15 ऑगस्ट रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ध्वजारोहणासाठी आतिशीचं नाव पुढं केलं होतं. तेव्हाच आतिशी या अरविंद केजरीवाल यांच्या उत्तराधिकारी होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती.
हेही वाचा -
- 59व्या वर्षी 'तेजस' विमान चालवणारे अमरप्रीत सिंग देशाचे नवीन हवाई दल प्रमुख - AP Singh New Air Force chief
- अरविंद केजरीवाल यांची 'आतिशी' खेळी : शिला दीक्षितांनंतर दिल्लीत पुन्हा 'महिलाराज', देशात आत्तापर्यंत 16 महिला मुख्यमंत्री - Delhi CM Announcement
- अरविंद केजरीवाल यांचा उत्तराधिकारी ठरला : आतिशी होणार दिल्लीच्या मुख्यमंत्री, थोड्याचं वेळात घोषणेची शक्यता - Atishi Will Be Next CM Of Delhi