नवी दिल्ली 5 Family Member Suicide : दिल्लीतील रंगपुरी भागात वडिलांनी आपल्या चार अपंग मुलींसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आगे. पाचही जणांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याचं सांगितलं जातंय. या मुलींच्या आईचा कर्करोगानं आधीच मृत्यू झाला होता. दरम्यान, पोलिसांनी शुक्रवारी (27 सप्टेंबर) रात्री उशिरा घराचे कुलूप तोडून सर्व मृतदेह बाहेर काढले. मुलींना चालता येत नसल्यानं वडिलांनी हे पाऊल उचलल्याचं चौकशीत उघड झालंय.
कारपेंटर म्हणून करत होते काम :मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे बिहारच्या छपरा जिल्ह्यातील रहिवासी असलेले हे कुटुंब काही वर्षांपासून रंगपुरी भागात भाड्याच्या घरात राहत होते. मृत वडिलांचे वय सुमारे 50 वर्षे असून वसंतकुंज परिसरातील एका खासगी रुग्णालयात ते कारपेंटरचे काम करत होते. त्यांना चार मुली होत्या. तर कर्करोगामुळं त्यांच्या पत्नीचं निधन झालं होतं. शुक्रवारी संध्याकाळी त्यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानं शेजाऱ्यांनी घरमालकासह पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
वडिलांसह मुलींची आत्महत्या : घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. घराच्या आतून कोणताही प्रतिसाद न आल्यानं अखेर पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला. तेव्हा घरात पाच मृतदेह आढळले. आत्महत्येची ही घटना दोन ते तीन दिवसांपूर्वी घडली असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. मृत व्यक्तीला तीन-चार दिवसांपासून शेजाऱ्यांनी बघितलं नव्हतं. पोलिसांना घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. स्थानिक पोलिसांसह फॉरेन्सिक टीम घटनास्थळाची पाहणी करत असून सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.
मुलींच्या संगोपनाची चिंता :पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपंग मुलींचे वडील आपल्या मुलींच्या संगोपनाची चिंता करत होते. त्यांच्या चारही मुली पलंगावर पडून होत्या. अपंग असल्यामुळं त्यांना चालता येत नव्हतं. मोठ्या मुलीचं वय 18 वर्षे, दुसऱ्या मुलीचं वय 15 वर्षे, तिसऱ्या मुलीचं वय 10 वर्षे तर चौथ्या सर्वात लहान मुलीचं वय आठ वर्षे होतं.
हेही वाचा -
- अमरावती विद्यापीठ कर्मचाऱ्यांची आईसह आत्महत्या; कारमध्ये सापडली 'सुसाईड नोट' - Amravati Suicide Case
- पती-पत्नीची मुलीसह आत्महत्या, कुटुंबाकडून कंपनीवर गंभीर आरोप - Nashik Suicide News
- लोक आत्महत्या का करतात? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत - Warning Sign Of Suicide