नवी दिल्ली : विधानसभा निवडणूक 2024 च्या रणधुमाळीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. भाजपा नेत्यांनी आता लिंगायत समाजातील मतांवर आपला डोळा ठेवला आहे. त्यामुळे लिंगायत समाजाचं वर्चस्व असलेल्या मतदार संघात भाजपानं कर्नाटकमधील बड्या नेत्यांना मैदानात उतरवलं आहे. सोलापूर, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात कर्नाटकमधील अनेक बडे नेते तळ ठोकून आहेत. प्रल्हाद जोशी, शोभा करंजळे, व्ही सोमन्ना, भगवंत खुबा आदी नेत्यांना खास पाचारण करण्यात आलं आहे.
भाजपाचा लिंगायत मतांवर डोळा : भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी महाराष्ट्र निवडणूक 2024 च्या प्रचारासाठी अनेक दिग्गज नेत्यांना महाराष्ट्रात पाठवलं आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागात असलेल्या लिंगायत समाजाच्या मतांवर डोळा ठेवून भाजपानं रणनिती आखली आहे. कर्नाटकमधील अनेक बड्या नेत्यांना भाजपानं सीमाभागात पाठवलं आहे. हे नेते सीमाभागात तळ ठोकून आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. प्रल्हाद जोशी, शोभा करंजळे, व्ही सोमन्ना, भगवंत खुबा आदी नेत्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यांच्याशिवाय उत्तर कर्नाटकातील लिंगायत नेते अरविंद बेल्लाड, मुरुगेश निराणी, महेश तेंगीनाकई यांनाही मराठवाड्यात निवडणूक प्रचारात उतरवले आहे. भाषा आणि संस्कृतीच्या माध्यमातून लिंगायत समाजाची मतं मिळवण्यात या नेत्यांनीही कंबर कसली आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि शोभा करंजाळे हेही मराठवाड्यात प्रचार करत आहेत.
लिंगायत मतदारांवर डोळा ठेवून अर्चना पाटील यांचा पक्ष प्रवेश : कर्नाटकातील बहुतांश नेत्यांना भाजपानं मुंबई आणि पुण्यातील लिंगायत समाजाच्या नागरिकांपर्यंत पोहोचण्यास सांगितलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांची सून अर्चना पाटील चारुरकर यांना भाजपामध्ये प्रवेश देऊन या व्होट बँकेला संदेश देण्याचा प्रयत्न भाजपानं केला. ही व्होट बँक भाजपाच्या बाजूनं बळकट करण्यासाठी पक्षाचे कर्नाटकातील नेते या भागातील लिंगायत समाजाशी सातत्यानं संपर्क करत आहेत. विशेष म्हणजे लिंगायत समाजाची व्होट बँक मुंबई, पुणे, लातूर, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, नांदेडसह मराठवाड्यात अधिक आहे.
काँग्रेसने एम बी पाटील यांच्यावर टाकली जबाबदारी : महायुतीच नाही तर महाविकास आघाडीच्या पक्षांचाही लिंगायत व्होट बँकेकडं डोळा आहे. सोलापूर आणि पुणे विभागाच्या प्रचाराची जबाबदारीही काँग्रेसनं कर्नाटकचे उद्योगमंत्री एम बी पाटील आणि छत्तीसगडचे माजी उपमुख्यमंत्री टीएस सिंहदेव यांच्यावर सोपवली आहे.
लिंगायत समाज महायुतीसोबत, भाजपाचा दावा : या संदर्भात भाजपाचे प्रवक्ते प्रेम शुक्ला म्हणतात की, "लिंगायत समाज कर्नाटकातही भाजपाला पाठिंबा देत आहे. महाराष्ट्रातील लिंगायत समाज आणि कन्नड भाषिक लोकही महायुतीला पाठिंबा देतील. त्यांना काँग्रेस सरकारच्या भ्रष्टाचाराची चांगलीच कल्पना आहे. कर्नाटक ओळखीचे झाले. महाराष्ट्रातील जनतेला डबल इंजिनचे सरकार हवे असून महायुतीलाच मतदान करणार आहेत."
हेही वाचा :
- Lingayat Politics : बॉम्बे कर्नाटक अन् लिंगायत समाजाने केला भाजपाचा खेळ खल्लास
- Karnataka Assembly Election 2023: दोन मातब्बर नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, भाजपात अस्वस्थता, मुख्यमंत्रीपदासाठी लिंगायत चेहरा?
- Veerashaiva Lingayat Samaj : वीर शैव लिंगायत समाज हा मूळ हिंदू, बीडच्या कपिलधार येथील धर्मसभेत ठराव