नवी दिल्ली 75th Republic Day :भारत आज 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करतंय. . राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (पुर्वीचं ट्विटर) वर एका पोस्टमध्ये म्हटलंय की, "देशातील आमच्या सर्व कुटुंबियांना प्रजासत्ताक दिनाच्या अनेक शुभेच्छा. जय हिंद!"
महाराष्ट्र देशाचं ग्रोथ इंजिन :महाराष्ट्राचेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रजासत्तार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले, "आज भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होतोय. यानिमित्तानं राज्यातील जनतेला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनादेखील विनम्र अभिवादन करतो. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातल्या ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांनासुद्धा माझं वंदन. महाराष्ट्र हे या देशाचं ग्रोथ इंजिन आहे. हे स्थान टिकवण्यासाठी मागील दीड वर्षांच्या काळात महायुती सरकारनं आपलं कर्तव्य जबाबदारीनं पार पाडलंय. हे मी अभिमानानं सांगू इच्छितो. सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, सांस्कृतिक क्रीडा या सर्वच आघाड्यांवर महाराष्ट्रनं आपली छाप टाकण्यास सुरुवात केलीय. महाराष्ट्रात एक छोटा भारत वसलेला आहे, असं आपण म्हणतो. त्यामुळंच भारताच्या प्रगतीची पताका डौलाने फडकत ठेवण्यासाठी आपली एकजूट महत्वाची आहे."
अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांनी दिल्या शुभेच्छा : अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांनी शुक्रवारी भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीयांना शुभेच्छा दिल्या. यात त्यांनी उभय देशांमधील 'जनतेचे लोक-जनतेचे संबंध' अधिक दृढ होतील, अशी आशा व्यक्त केला. ते म्हणाले, "पुढील वर्षात, दोन्ही देशांमधील लोक संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि आमच्या सर्वात महत्त्वाच्या प्राधान्यक्रमांवर सहयोग करण्यासाठी पुढं जाण्यास उत्सुक आहोत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भारतासोबतच्या अमेरिकेच्या संबंधांना 'जगातील सर्वात फलदायी संबंधांपैकी एक' म्हटलंय. अमेरिकेच्या वतीनं मी भारतीयांना भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देतो. भारताची राज्यघटना जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीसाठी एक स्थिर चौकट आणि जागतिक नेतृत्वाचा पाया प्रदान करत आहे. या प्रसंगी प्रजासत्ताक दिन साजरा करणाऱ्या भारतीयांना मी माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो."
विकसीत देश म्हणून प्रस्थापित करण्याचा संकल्प : देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या. भारताला एक मजबूत आणि विकसित देश म्हणून प्रस्थापित करण्याचा त्यांचा संकल्प दृढ करण्याचं त्यांनी आवाहन केलंय. राजनाथ सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एका पोस्टमध्ये म्हटलंय की, "75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा. या ऐतिहासिक प्रसंगी आपण सर्वांनी भारताला एक मजबूत आणि विकसित देश म्हणून प्रस्थापित करण्याचा आपला संकल्प दृढ करूया. जय हिंद!"
हेही वाचा :
- केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा; जाणून घ्या महाराष्ट्रातील कोणाचा करण्यात आला गौरव ?
- माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यासह 132 जणांना पद्म पुरस्कार जाहीर, पंतप्रधानांनी केले अभिनंदन
- प्रजासत्ताक दिन : महाराष्ट्र पोलीस दलाला एकूण 62 पदके जाहीर; 4 अधिकारी ठरले राष्ट्रपती पदकाचे मानकरी