अमरावतीत संजय राऊतांविरोधात भाजपा महिला आघाडी आक्रमक; नवनीत राणांविरोधात अपशब्द वापरल्याचा रोष - Sanjay Raut Criticized Navneet Rana - SANJAY RAUT CRITICIZED NAVNEET RANA
🎬 Watch Now: Feature Video
Published : Apr 18, 2024, 11:02 PM IST
अमरावती Protests Against Sanjay Raut : अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याबाबत शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी गैरविधान केल्याच्या निषेधार्थ भाजपा महिला आघाडीच्यावतीने त्यांचा राजकमल चौकात तीव्र निषेध नोंदविण्यात आला. यावेळी भाजपाच्या महिला पदाधिकारी चांगल्याच आक्रमक झाल्या. त्यांनी एकत्रित येऊन रस्त्यावर धरणे दिले. यावेळी खासदार संजय राऊत यांच्या पोस्टरला चपला मारण्यात आल्या तसेच त्यांच्या पोस्टरवर बांगड्या देखील भिरकवण्यात आल्या.
राजकमल चौकात 'रास्ता रोको' : संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या भाजपाच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि महिलांनी राजकमल चौकात संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी राजकमल चौकात ठिय्या दिल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. पोलिसांनी आंदोलकांना रस्त्यातून उठण्यासाठी विनंती केली. आक्रमक महिलांना आवरणे पोलिसांना देखील बराच वेळपर्यंत कठीण गेले.
संजय राऊत यांचे विवादित विधान : शिवसेनेच्या मेळाव्याला संबोधित करताना खासदार संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्या बोलण्याला त्यांच्या रूपाला आणि कुठल्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडू नका, असे म्हणत त्यांचा विवादित उल्लेख केला. संजय राऊत यांच्या अशा वक्तव्यामुळे भाजपा महिला आघाडीकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.