टेक्सास Rahul Gandhi On AI : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी 8 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर या कालावधीत अमेरिका दौऱ्यावर आहेत. 8 रोजी सप्टेंबर रोजी डॅलस येथील टेक्सास विद्यापीठात त्यांनी भारत आणि पाश्चिमात्य देशातील रोजगार परिस्थितीवर आपलं मत व्यक्त केलं.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भविष्यावर भर : राहुल गांधींच्या भाषणात भारतातील रोजगाराची सद्यस्थिती आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भविष्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं. त्यांनी लक्ष वेधलं की भारतानं उत्पादन आणि तांत्रिक नवकल्पनांचा योग्य वापर करण्यावर लक्ष केंद्रित करणं, आवश्यक आहे. जेणेकरून देशातील बेरोजगारीची समस्या कमी करता येईल. AI सारख्या नवीन तंत्रज्ञानाच्या संधींचा लाभ घेता येईल.
"मला आठवतं माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी भारतीयांना संगणकाची गरज नाही, असं भाषण केलं होतं. तसंच भारतीयांना इंग्रजीची गरज नाही, असंही काही जण म्हणत होते. परंतु संगणकांमुळं भारतात लाखो नोकऱ्या निर्माण झाल्या. त्यामुळं तुम्ही भविष्याकडं कसं पहाता यावर सर्व अवलंबून असतं." - राहुल गांधी, विरोधी पक्षनेते, लोकसभा
उत्पादन रोजगार निर्मितीचं प्रमुख साधन : रोजगाराच्या समस्येवर चर्चा करताना राहुल गांधी म्हणाले की, "पाश्चात्य देश आणि भारतात रोजगाराचे संकट आहे, तर चीन आणि व्हिएतनामसारख्या देशांमध्ये ही समस्या अस्तित्वात नाही. 1940, 50 आणि 60 च्या दशकात अमेरिका हे जागतिक उत्पादनाचं केंद्र होतं. परंतु आता ही भूमिका चीनकडं करत आहे. त्यामुळं पाश्चात्य देश, अमेरिका, युरोप आणि भारतात रोजगाराच्या संधी कमी झाल्या आहेत. उत्पादन हे रोजगार निर्मितीचं प्रमुख साधन आहे. परंतु या देशांनी ते सोडून दिलं आहे. उत्पादन चीन आणि इतर देशांत जास्त होतंय. भारतानं उत्पादन क्षेत्रावर पुन्हा लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, जेणेकरून देशात रोजगाराच्या संधी वाढू शकतील".
AI आणि भविष्यातील नोकऱ्यांबद्दल चिंता : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) विषयी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, "प्रत्येक नवीन तंत्रज्ञानाच्या आगमनासोबत नोकऱ्या जाणार असल्याचा सुर आपल्याला दिसतो. कॉम्प्युटर आणि कॅल्क्युलेटर आल्यावर तेच बोललं जात होतं, पण नंतर याच क्षेत्रात नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या. एआयमुळं भारताच्या आयटी उद्योगाला मोठ्या आव्हानाला सामोरं जावं लागू शकतं", असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, राहुल गांधी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यासाठी रविवारी टेक्सासमधील डॅलस येथे पोहोचले. काँग्रेस खासदारांचं विमानतळावर इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी स्वागत केलं.