पुणे Young Girl Sexually Assaulted : राज्यात महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांमधून महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. त्यातच आता पुण्यातील कोरेगाव पार्क हद्दीत अशीच घटना घडल्याचं समोर आलय. सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीतून एका महाविद्यालयीन तरुणीवर चार जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महाविद्यालयात सुरू असलेल्या 'गुड टच बॅड टच' या उपक्रमातून ही घटना समोर आली. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांकडून पॉक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आलीय. तर चार आरोपींपैकी दोन तरुण अल्पवयीन आरोपींनाही ताब्यात घेण्यात आलंय.
नेमकं काय घडलं? : पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असलेल्या एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. या महाविद्यालयात घेण्यात आलेल्या 'गुड टच बॅड टच' उपक्रमातून ही घटना उघडकीस आली. पीडित तरुणी तिच्या वडिलांच्या फोनवरुन सोशल मीडिया वापरत होती. यावरुनच तिची आरोपी तरुणांशी मैत्री झाली. त्यानंतर पीडित तरुणीला भेटायला आलेल्या एका आरोपीनं तिच्यावर कॉलेजमध्येच अत्याचार केले. तर दुसऱ्यानं तिच्या घरी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. इतर 2 आरोपींनी देखील तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेत तिच्यावर अतिप्रसंग केला. हा सर्व प्रकार एप्रिल महिन्यापासून सुरू होता. तर तपासादरम्यान या प्रकरणातील आरोपी तरुणांची एकमेकांशी ओळख नसल्याचं समोर आलंय.
रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया : या प्रकरणी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, "शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात घडलेली ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. अशा घटनांची मी नेहमीच दखल घेत असतो. प्रत्येक घटनेतील पीडितेला न्याय मिळवून देण्याचा मी प्रयत्न करतो. परंतु, या सर्व घटनांना गुन्हेगारांप्रमाणेच या व्यवस्थेतील घटक देखील जबाबदार असतात. माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना आणि पुणे शहराच्या पालकमंत्र्यांना विनंती आहे की, आपण देखील या घटनेकडं तितकंच गांभीर्यानं पाहावं. घटनेतील पीडितेला न्याय मिळवून द्यावा आणि आरोपीला कठोर शिक्षा करावी. ज्यामुळं पुन्हा कोणीही अशा प्रकारचं कृत्य करण्याची हिंमत करणार नाही."
हेही वाचा -