मुंबई Yogi Adityanath : योगी आदित्यनाथ यांनी केलेलं वक्तव्य अतिशय निंदनीय आणि अत्यंत चुकीचं आहे. ते मुख्यमंत्री असतील किंवा कोणत्या एखाद्या पक्षाचे नेते असतील तरी चुकीचं वक्तव्य खपवून घेणार नाही, असा इशारा महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी दिला आहे. (Shivaji Maharaj) छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत सर्वांत जास्त वाटा राजमाता जिजाऊ, वडील छत्रपती शहाजीराजे आणि आध्यात्मिक मार्गदर्शन जगद्गुरु तुकारामांचा आहे.
शिवचरित्राशी वारंवार छेडखानी: 2018 औरंगाबाद खंडविद्यापीठानं निर्वाळा दिला आहे. रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा दुरान्वय संबंध नाही. शिवचरित्राशी वारंवार छेडखानी करून वादग्रस्त वक्तव्य करणं यामागे नेमकं आपणास काय विचार पेरायचे आहेत, असा सवाल अमोल मिटकरी यांनी योगी आदित्यनाथ यांना विचारला आहे. महाराष्ट्रातील इतिहासाबद्दल आपला अभ्यास नसेल तर यापुढे महाराष्ट्रात येण्यापूर्वी शिवचरित्राचा अभ्यास करून यावं. नंतरच शिवाजी महाराजांवर बोलावं, अशा प्रकारे अकलेचे तारे योगी आदित्यनाथ यांनी तोडू नये, असा सल्ला अमोल मिटकरी यांनी दिला आहे.
संभाजी राजे धर्मवीर की स्वराज्य रक्षक? अजित पवार मित्र मंडळाकडून संपूर्ण आठवडाभर स्वराज्य सप्ताहाचं आयोजन केलं गेलं आहे. यावरून शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला डिवचलं आहे. तसेच योगी आदित्यनाथ यांच्या विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू रामदास स्वामी होते, अशा प्रकारे भाजपा आणि आरएसएस यांच्या कडून सांगितलं जातं आहे. यावर अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, छत्रपती संभाजी राजे स्वराज्य रक्षक होते की धर्मवीर, हे स्वराज्य सप्ताहात जरूर सांगावं असं विकास लवांडे यांनी आवाहन केलं आहे.
भाजपा जातीत तेढ वाढविण्याचं काम करतय? उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात येऊन पुन्हा एकदा इतिहासावर बोलून जाती जातीत, धर्माधर्मात तेढ निर्माण करतारहेत. भाजपाच्या नेत्यांना प्रक्षोभक बोलून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा परवाना गृहमंत्र्यांनी दिला आहे का? असा सवाल काँग्रेस प्रवक्ता काका कुलकर्णी यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.
महाराष्ट्राचा इतिहास बदलण्याचा खोडसाळपणा: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आळंदीमध्ये केलेल्या भाषणादरम्यान रामदास स्वामी हे छत्रपती शिवरायांचे गुरू होते. त्यांनी शिवरायांना घडवलं, असा उल्लेख केला आहे. महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राचा इतिहास बदलण्याचं काम खोडसाळपणे सुरू आहे. याची दखल महाराष्ट्रानं आणि राज्यकर्त्यांनी घ्यावी, अशी प्रतिक्रिया लोकप्रतिनिधी आणि इतिहासतज्ञांनी व्यक्त केली आहे.
योगी आदित्यनाथ यांचा धिक्कार- मिटकरी: योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले की, 20 वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र हे डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. आ ह साळुंखे किंवा इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक जे आहेत त्यांच्याकडून वाचत आलेलो आहे. इतकंच काय मराठा सेवा संघाच्या जडणघडणीमध्ये मी अनेक इतिहासकारांचा इतिहास अभ्यासला तेव्हा असा कुठलाही पुरावा नाही की, रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरू होते. आजही अनेक ठिकाणी शिवजयंतीला किंवा तुम्ही अयोध्येला जर बघितलं असेल तर महाराजांचे निश्चयाचा महामेरू असं वर्णन रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांचं केलं, असं सांगितलेलं आहे. इंजिनीयर चंद्रशेखर शिखरे यांचं प्रति इतिहास नावाचं पुस्तक आहे. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंतयोगी. हे जे पत्र रामदास स्वामींनी लिहिलंय हे राज्याभिषेकाच्या नंतर लिहिलं आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींची भेट घेतली नाही किंवा त्यांची कुठेही भेट झाली नाही, असा दावा आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. हे 13 समासाचे पत्र आहे; पण यातले 11 समास शिवकल्याण राजा यामध्ये आहेत. लतादीदींनी ११ समास गायले. यातला बारावा समाज या मधला असा सांगतो, तुम्ही देशी वास्तव्य केले; परंतु वर्तमान नाही घेतले. प्रसंग नसता लिहिली. क्षमा केली पाहिजे. जर ते गुरू होते तर त्यांनी क्षमायाचना का केली असा इतिहासाला या निमित्ताने प्रश्न पडतो, असंही मिटकरी म्हणाले.
हा तर आदित्यनाथांचा खोडसाळपणा : आमदार अमोल मिटकरी पुढे म्हणाले की, छत्रपती शिवरायांची खरी जडणघडण सुरू झाली ती राष्ट्रमाता जिजाऊंच्या तालमीमध्ये आणि त्यांना प्रचंड पाठबळ जे मिळालं ते छत्रपती शहाजी महाराजांचं. बारा मावळामध्ये संघटन करताना जगद्गुरु तुकोबारायांच्या वारकरी धर्माचा प्रभाव त्यांच्यावर राहिल्यामुळे स्वराज्याची बांधणी करताना तुकोबारायांचा फायदा झाला, त्यांना सहकार्य लाभलं. आता योगी आदित्यनाथ सारखी बाहेरची माणसं येतात आणि जाणीवपूर्वक भाषण करून महाराजांचा रामदास स्वामींशी संबध जोडण्याचा खोडसाळ प्रयत्न करतात. राम मंदिराच्या वेळी रामदास स्वामी आणि छत्रपती शिवरायांचा संबंध दाखवण्याचा प्रयत्न केला आणि तोच धागा धरून काल (11 फेब्रुवारी) आळंदीमध्ये योगी आदित्यनाथ बोलले. इतिहासाचा अभ्यासक म्हणून मी या गोष्टीचा धिक्कार करतो, निषेध करतो. राज्य सरकारने याची दखल घ्यावी.
महाराष्ट्रानं आता जागं व्हावं - सावंत: योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्याबद्दल इतिहास तज्ञ इंद्रजीत सावंत यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. योगी आदित्यनाथ यांनी चक्क बाप बदलण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे वक्तव्य अत्यंत घाणेरडे आणि लाजिरवाणे आहे. महाराष्ट्रानं आता या वक्तव्यानं जागे व्हायची गरज आहे. अशा पद्धतीचा अपमान सहन करता कामा नये. स्वतःला पुरोगामी आणि अहिंसावादी समजणाऱ्या लोकांनी अशा वक्तव्याबद्दल कडाडून विरोध करत रस्त्यावर उतरायला पाहिजे, असंही सावंत म्हणाले.
मराठा कर्तृत्ववान नाही, हे दाखवण्याचा प्रयत्न : या संदर्भात बोलताना इतिहास तज्ञ इंद्रजीत सावंत पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा होते आणि मराठा हा कसा कर्तृत्ववान असू शकेल? जरी त्याने काही कर्तृत्व गाजवलं असलं तरी ते ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखालीच. म्हणूनच योगी आदित्यनाथ यांनी रामदास स्वामींचा उल्लेख छत्रपती शिवरायांचे गुरू म्हणून केला आहे आणि तो अत्यंत घृणास्पद आहे, असे मत सावंत यांनी व्यक्त केले. वास्तविक छत्रपती शिवरायांच्या समकालीन बाबा याकूब, मौनी बाबा, तुकोबाराय होते. यांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. इतिहासाची अशा पद्धतीची मोडतोड करून आपल्याला हवा तसा इतिहास मारायचा हा भाजपाचा खूप वर्षांपासून चाललेला प्रयत्न आहे, असा आरोपही सावंत यांनी केला. दरम्यान, यासंदर्भात भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
हेही वाचा: