मुंबई Worli Hit And Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाहला अटक करण्यात आली आहे. तसंच आरोपीच्या आईसह मोठी बहीण पुजालाही ताब्यात घेतलंय. मुख्य आरोपी मिहीर शाहला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी नाखवा कुटुंबीयांनी केली. तसंच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आमच्या घराची अवस्था बघायला आले नसल्याची खंत कावेरी यांची कन्या अमृता नाखवा हिनं व्यक्त केली. मृत कावेरी यांची बहीण रीना हिनंही सत्य सर्वांसमोर आणण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करण्याची मागणी केली. संपूर्ण नाखवा कुटुंबावर शोककळा पसरली असून मृत कावेरी यांचे पती प्रदीप नाखवा, त्यांची मुलगी अमृता नाखवा यांनी 'ईटीव्ही भारत'सोबत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मिहीरला मदत करणाऱ्या 12 जणांना अटक : मिहीर शाह यानं कावेरी नाखवा या महिलेचा वरळीतील अट्रिया मॉलजवळ दारूच्या नशेत भरधाव वेगात गाडी चालवून खून केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यानंतर तो फरार झाला होता. आता पोलिसांनी त्याला दोन दिवसांनी शहापूर येथून अटक केली. मिहीर शाह याची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे. अपघातानंतर फरार झालेल्या मिहीर शाहच्या मागावर मुंबई पोलिसांची आठ पथके होती. पोलिसांनी मिहीर शाहसह त्याला मदत करणाऱ्या 12 जणांना अटक केली. अपघाताच्या वेळी मिहीर शाहनं मद्यपान केलं होतं का? अपघाताच्या वेळी नेमके काय घडलं? याबाबत पोलीस आता अधिक माहिती घेणार आहेत. याआधी पोलिसांनी मिहीर शाहच्या मैत्रिणीचा जबाब नोंदवला होता. आरोपीचे वडील राजेश शाह, चालक राजऋषी सिंग यांनाही पोलिसांनी अटक केली होती. मात्र, राजेश शाह यांना जामीन मिळाला.
मिहीरला पळून जाण्याचा सल्ला? : या प्रकरणात राजेश शाह यांनी अपघात झालेल्या गाडीवरील पक्षाचा झेंडा, नंबर प्लेट बदलण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. तसंच कार अज्ञातस्थळी लपविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासोबतच पोलीस तपासात असंही समोर आलं आहे की, राजेश शाह यांना फोनवरून अपघाताची माहिती दिल्यानंतर राजेश यांनी मिहीर शाहला पळून जाण्याचा सल्ला दिला होता. वरळी दुर्घटनेवरून राजकारण तापलं असून विरोधकांनी या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षाला धारेवर धरलं आहे. मिहीर शाहचे वडील राजेश शाह शिवसेनेचे पालघर उपनेते आहेत. त्यामुळं सत्ताधारी पक्ष आरोपींना पाठीशी घालत असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.
हे वाचलंत का :