अमरावती Elephant Day celebration Amravati : जगभरात दरवर्षी 12 ऑगस्ट हा दिवस 'जागतिक हत्ती दिन' म्हणून साजरा केला जातो. हत्ती हा पृथ्वीवर जमिनीवर आढळणारा सर्वात मोठा प्राणी आहे. हत्ती दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश जगभरातील हत्तींबद्दल जागरूकता आणि संरक्षणाचा प्रचार करणं हा आहे. मेघाटातील कोलकास इथे येणाऱ्या पर्यटकांना निसर्गदर्शन घडविणाऱ्या हत्तींचा खास वाढदिवसाचा सोहळा 'जागतिक हत्तीदिना'निमित्त सोमवारी सकाळी रंगला. हॅपी बर्थडे हत्ती अशा शुभेच्छा कोलकास येथे असणाऱ्या चारही हत्तींना पर्यटक तसंच सेमाडोह येथील जिल्हा परिषद शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दिला.
असा रंगला सोहळा : उपवनसंरक्षक दिव्या भारती आणि सेमाडोह येथील वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप तडखनकर यांच्या संकल्पनेतून आज 'जागतिक हत्ती दिना'च्या पर्वावर कोलकास येथील हत्तींच्या वाढदिवसाचा सोहळा रंगला. सेमाडोह येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना या कार्यक्रमानिमित्त स्पेशल बस द्वारे कोलकासला आणण्यात आलं. या सोहळ्यानिमित्त कोलकास येथील पर्यटन संकुल हार, फुले आणि फुग्यांनी सजवण्यात आलं होतं. जयश्री, चंपाकली, लक्ष्मी, सुंदरमाला या चारही हत्तींना हत्ती सफारी स्थळा नजीक ओवाळण्यात आलं. त्यांचा औक्षमान करून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी शाळकरी चिमुकल्यांनी हॅपी बर्थडे टू यू म्हणत या हत्तींना खास शुभेच्छा दिल्या. या निमित्तानं हत्तींना केळीसह त्यांच्या आवडीच्या खाद्यपदार्थांची मेजवानी देण्यात आली.
इंदिरा गांधींच्या मेजवर चिमुकल्यांना मेजवानी : सीमाडोह या ठिकाणी 1974 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आल्या असताना त्यांच्यासाठी खास विश्रामगृह उभारण्यात आलं. या विश्रामगृहात इंदिरा गांधी यांनी मुक्काम केला होता. ज्या मेसवर इंदिरा गांधींसाठी मेजवानीची व्यवस्था करण्यात आली, त्याच मेसवर आज 'जागतिक हत्ती दिन' साजरा करण्यासाठी आलेल्या जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांना व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी खास मेजवानी दिली. विद्यार्थ्यांनी या संपूर्ण सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटला.
चिमुकल्यांनी जाणून घेतलं हत्तीचं महत्त्व : 'जागतिक हत्ती दिना'च्या खास सोहळ्यानिमित्त चिमुकल्यांना हत्ती संवर्धनाचं महत्त्व पटवून सांगण्यात आलं. हत्तीवर प्रेम करणं हे मनुष्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. पर्यावरणदृष्ट्या देखील हत्ती किती उपयुक्त आहे, या संदर्भात देखील या सोहळ्यानिमित्त चिमुकल्यांना माहिती दिली असल्याचं सीमा डोह वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप तडखनकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं. कोलकास या ठिकाणी 1972 पासून हत्तींचं वास्तव्य आहे. ज्या भागात वाहन जाऊ शकत नाही, अशा भागात लाकडं आणण्यासाठी यासह जंगलात गस्त घालण्यासाठी हत्तींचा वापर केला जायचा, अशी माहिती देखील विद्यार्थ्यांना सांगितली असल्याचं प्रदीप तडखनकर म्हणाले.
हेही वाचा
- रानभाज्यापासून ते विड्याच्या पानापर्यंत सर्वच मिळणार परसबागेत; चक्क अपार्टमेंटच्या छतावर फुलवली 'जैविक शेती' - Natural Farming on Building Teres
- जागतिक हत्ती दिन 2024 विशेष: झारखंडच्या हत्तीचं 'हे' वैशिष्ट्य ठरतंय खास, पलामू व्याघ्र प्रकल्पात आहेत 180 हून अधिक हत्ती - World Elephant Day 2024
- जागतिक हत्ती दिन विशेष; हत्तींबाबतच्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?