चंद्रपूर : आज चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र मतदान सुरू असताना, एक वेगळाच प्रकार भद्रावती येथे घडला. मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आलेल्या एका महिलेने थेट ईव्हीएम मशीनच जमिनीवर आपटला. यानंतर महिलेने "ईव्हीएम हटाव देश बचाव" अशी घोषणाबाजी केली. यानंतर एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती, पोलीस निरीक्षक अमोल कचरे यांनी दिली.
'ईव्हीएम' मशीन जमिनीवर आपटली : "वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या भद्रावती शहरातील जिल्हा परिषद शाळेतील बूथ क्रमांक 309 च्या खोली क्रमांक 1 येथे मतदान सुरू होतं. यावेळी येथे दुपारच्या सुमारास मतदानासाठी एक महिला आली होती. मतदानासाठी महिलेची ओळख पूर्ण केली आणि तिच्या बोटाला शाई लावल्यानंतर ही महिला ईव्हीएम मशीनकडं गेली. यानंतर या महिलेनं थेट ईव्हीएम मशीन उचलत जमिनीवर आपटला. त्यानंतर "ईव्हीएम हटाव, देश बचाव", मतदान हे बॅलेट पेपरवरच घेण्यात यावे, अशीही घोषणा केली. अचानक हा प्रकार झाल्यानं तिथे कार्यरत निवडणूक कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलं," अशी माहिती पोलीस निरीक्षक अमोल कचरे यांनी दिली.
भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होणार? : "ईव्हीएम मशीन खाली आपटल्यानं तब्बल अर्धा तास मतदानाची प्रक्रिया खोळंबली होती. तर निवडणूक अधिकारी यांच्या फिर्यादीनंतर, महिलेला भद्रावती पोलिसांनी ताब्यात घेतले," अशी माहिती पोलीस निरीक्षक अमोल कचरे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
हेही वाचा -