पुणे Girish Mahajan On Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत. आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणाविरोधात उपोषण सुरू केलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागलं असून दोन्ही समाजाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. या सर्व घडामोडीदरम्यान राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा भाजपा नेते गिरीश महाजन पुणे दौऱ्यावर आले. त्यावेळी त्यांनी अनेक राजकीय घडामोडींवरही आपलं मत मांडलं.
आरक्षणाबाबत सर्व काही केलं : गेल्या वर्षभरात मनोज जरांगे पाटील यांनी अनेकवेळा उपोषण करून आंदोलन केलं. राज्य सरकारनं मराठा आरक्षणाबाबत आजपर्यंत सर्व काही केलं. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. तसंच मराठा आरक्षणाच्या बाबतीत 50 वर्षात कोणी प्रयत्न केला का? मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज काय, असं शरद पवार म्हणाले होते. मात्र, तेच आता आमच्यावर टीका करत आहेत, असं महाजन म्हणाले.
...तर आम्ही काय करणार? : आम्ही मराठ्यांच्या बाजूनं आहोत, ओबीसींना धक्का न लावता त्यांना आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे. पण जरांगे पाटलाचं समाधान झालं नाही, तर आम्ही काय करणार. सगे-सोयरे यांना दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकणार नाही. तसंच माझ्या माहितीनुसार अशा प्रकारे आरक्षण देता येत नाही. मात्र, काही करता आलं, तर सरकार प्रयत्न करेल, असं ते म्हणाले.
राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न : भाजपानं मराठा तसंच ओबीसी या दोन्ही समाजात वाद निर्माण केल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्यावर महाजन म्हणाले, आता त्यांचा राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे आंदोलनं कसं निर्माण झालं? यांची सुप्रिया सुळे यांनाही चांगली माहिती आहे. मला सध्याच्या परिस्थितीबद्दल सांगायचं आहे की, त्यांनी दोन समुदायांमध्ये द्वेष, तेढ निर्माण होईल, अशी विधानं करू नयेत, असा सल्ला महाजन यांनी सुळेंना दिला आहे.
पालखी सोहळ्याची आढावा बैठक : पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पालखी सोहळ्याची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी गिरीश महाजन म्हणाले की, यंदाच्या वारी सोहळ्यासाठी लाखो भाविक येणार आहेत. वारी चांगली होण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी पालखी निघेल, त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात येणार आहे. फिरती स्वच्छतागृहे, हिरकणी कक्ष वाढविण्यात आले आहेत. वारकऱ्यांसाठी पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.
'हे' वाचलंत का :
- ज्यांनी मतदान केलं नाही त्यांना मोफत धान्य देऊ नका; पंतप्रधान नरेंद्र मोदींना भाजपा नेत्याचं पत्र - Demanding Ban Free Ration
- 'ठाकरेंचा विजय ही तात्पुरती आलेली सूज, त्यांना हिंदुत्वाची लाज वाटते'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर घणाघात - Eknath Shinde Speech
- एकनाथ शिंदे यांचे बंड ते लोकसभा निवडणुकीच्या निकालापर्यंत शिवसेनेत काय वादळे आली? जाणून घ्या सविस्तर - Shiv Sena Foundation Day 2024